सोलापूर - कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यापासून विडी कारखाने बंद करण्यात आले होते. जवळपास 60 ते 65 हजार महिलांना विडी उद्योगातून रोजगार मिळतो. पण कोरोनाची दुसरी लाट आणि कडक लॉकडाऊन यामुळे विडी उद्योगावर संसाराचा गाडा हाकणाऱ्या महिलांवर उपासमारीची वेळ आली होती. कोरोना महामारीची तीव्रता नियंत्रणात येत असताना विडी कारखाने सुरू करा, या मागणीने जोर धरला होता. अखेर आज सोमवारी 7 जून पासून शहरातील सर्व विडी कारखाने सुरू करण्यात आली आहे. पण तंबाखू आणि विडीपत्ता घेण्यासाठी आलेल्या सर्व महिलांची रॅपिड टेस्ट करून त्यांना विडी तंबाखू आणि विडीपत्ता देण्यात आला आहे. सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी पुढाकार घेत सोलापूर महानगरपालिका उपायुक्त धनराज पांडे यांना शहर आरोग्य प्रशासनाच्या टीममधील कर्मचाऱ्यांना सोबत घेत अँटीजेन टेस्ट घेण्यात आली.
तीन विडी कारखान्यात 600 महिलांची टेस्ट
सोलापुरातील तीन प्रमुख विडी कारखान्यात रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली. सोमवारी 7 जून रोजी दिवसभर विडी कामगार महिलांची टेस्ट घेण्यात आली. यामध्ये ठाकूर सावदेकर विडी कारखाना, लंगर विडी कारखाना व साबळे टोबॉको विडी कारखाना येथे मोफत अँटीजेन टेस्ट करण्याची सोय करण्यात आली होती. यामध्ये 600 विडी कामगारांची चाचणी करण्यात आली. एकाही महिलेला कोरोनाची बाधा झाली नसल्याचे अहवाल प्राप्त झाले. सर्व विडी कामगार महिलांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.