सोलापूर - शहर आणि जिल्ह्यात संचारबंदी लागू केलेली असताना सोलापूर शहरात मॉर्निंग वॉक करायला बाहेर पडलेल्या २२ जणांवर सोलापूर शहर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांवर ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच शहरातील इतर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मॉर्निंग वॉक करणाऱ्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे.
मॉर्निग वॉकसाठी फिरणे म्हणजे विनाकारण बाहेर फिरणे आहे-
सध्या सोलापुरात सर्वत्र कडक संचारबंदी लागू केलेली आहे.त्यामुळे नागरिकांना अनावश्यक बाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.असे असतानाही शहराच्या अवंती नगर, अभिमानश्री नगर आणि वसंत विहार परिसरातील पुरुष, महिला युवक-युवती आणि वृद्ध मॉर्निंग वॉकसाठी आज शनिवारी सकाळी बाहेर पडले होते.त्यामुळं रस्त्यावर गर्दीचे चित्र निर्माण झाले.सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे,हा कोविड नियमावली तोडणे किंवा आपत्ती व्यवस्थापनचे उल्लंघन करणे आहे.त्यामुळे विनाकारण बाहेर फिरणार्यावर गुन्हे दाखल होत आहेत.