सोलापूर -विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांविषयी सोलापूर विद्यापीठास वेळोवेळी निवेदन दिले, परंतु विद्यापीठाकडून आतापर्यत कसलेही सकारात्मक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे आज बुधवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात कुलगुरुंच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांचे मार्च/एप्रिल २०२० मध्ये फॉर्म भरायचे राहिले होते अशा विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म ऑक्टोबर २०२० मध्ये अतिविलंब शुल्कासह नोव्हेंबर २०२० मध्ये परीक्षा घेऊ या आश्वासनावर भरून घेतले होते. परंतु डिसेंबर अर्धा संपला अजूनही या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे नियोजन विद्यापीठाकडे नाही. त्या विद्यार्थ्यांचे अतिविलंब शुल्क परत करावे ही अभाविपची मागणी होती.
परीक्षा निकालाबाबत संभ्रम-
नुकतेच सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षेचे निकाल लागले आहे. ज्यात अनेक विद्यार्थ्यांना समस्या आल्या आहेत. निकाल राखीव असणे, अनुउपस्थिती दर्शवणे व अनेकांनी चांगले पेपर देऊन देखील नापास झाल्याच्या तक्रारी अभाविपकडे आल्या आहेत. त्याविषयी विद्यापीठ प्रशासनाशी चर्चा करून देखील त्यावर त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा उल्लंघन-
विद्यार्थ्यांना छायांकित प्रत मिळावी ही मागणी विद्यापीठाकडे केली आहे. ज्यावर 7 डिसेंम्बर 2020 रोजीच्या परिपत्रकात पुनर्मुल्याकन व छायांकित प्रत सुविधा देता येणार नाही असे विद्यापीठाने नमूद केले आहे. परंतु सुप्रीम कोर्टाच्या आदेशाद्वारे (२००७) विद्यापीठाला छायांकित प्रत उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे व ती उपलब्ध त्यांनी करून द्यावी. सोलापूर विद्यापीठ प्रशासन सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन करत असल्याची माहिती अभाविपने यावेळी बोलताना दिली.