महाराष्ट्र

maharashtra

कोरोनामुळे रुग्णांचे खचतेय मनोधैर्य; आनंदी जीवनासाठी तरुणांनी घेतला पुढाकार

By

Published : Nov 18, 2020, 6:08 PM IST

Updated : Nov 18, 2020, 7:39 PM IST

कोरोनाच्या भीतीने मानसिक तणाव निर्माण झालेल्यांमध्ये मरण पत्करण्याचे विचार घोंगावू लागल्याचेही प्रमाण वाढले होते. मात्र सोलापुरातील काही तरुणांनी कोरोना बाधित रुग्णांना या मानसिक तणावातून बाहेर काढण्यासाठी समुपदेशनाचे प्रयत्न केले आहेत. या तरुणांनी आतापर्यंत हजारो रुग्णांचे मन परिवर्तन केले

कोरोनामुळे रुग्णांचे खचतेय मनोधैर्य
कोरोनामुळे रुग्णांचे खचतेय मनोधैर्य

सोलापूर- कोरोना महामारीच्या सुरुवातीला अनेकांच्या मनात फक्त भीतीचे वातावरण होते. मात्र, या महामारीचा राज्यासह देशात शिरकाव झाला आणि ज्याप्रमाणात रुग्णसंख्या वाढू लागली ते पाहून अनेकांच्या जीवनात नैराश्य निर्माण झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. कोरोनाच्या भीतीने मानसिक तणाव निर्माण झालेल्यांमध्ये मरण पत्करण्याचे विचार घोंगावू लागल्याचेही प्रमाण वाढले होते, अशा परिस्थितीत काही तरुणांनी कोरोना बाधित रुग्ण आणि विलगीकरणातील नागरिकांना या मानसिक तणावातून बाहेर काढण्यासाठी समुपदेशनाचे प्रयत्न केले आहेत. या तरुणांनी कोविड रुग्णांना किंवा त्याच्या संपर्कात आलेल्या रुग्णांना क्वारंटाईन सेंटरमध्ये जाऊन त्यांचे समुपदेशन करत त्यांना धीर देऊन त्यांचे जीवन पुन्हा आनंदी करण्याचे कार्य सुरू केले आहे.

आनंदी जीवनासाठी तरुणांनी घेतला पुढाकार

कोरोना बाधितांना समाजाकडून चुकीची वागणूक-

गेल्या चार महिन्यांपासून रॉबर्ट गौडर, अस्लम शेख आणि त्यांच्या सहकार्यांनी क्वारंटाईन सेंटर जाऊन मानसिक तणावातून खचलेल्या कोविड रुग्णांची विचारपूस करण्यास सुरुवात केली. कोविड रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अनेक रुग्णांना मानसिक आधार दिला. कोरोना आजार पूर्णपणे बरा होत असल्याचे समजावून सांगितले. सुरुवातीच्या काळात कोरोना पॉझिटव्ह रुग्ण आणि त्याच्या कुटुंबीयांना वाळीत टाकल्याप्रमाणे वागणूक दिली गेल्याचे प्रकारही घडले. या विषाणूच्या भीतीने नागरिक त्यांना सामाजित सेवा सुविधा नाकारत असल्याचेही प्रकार समोर आले होत. या कोरोनाबाधितांची रहिवासी परिसरात बदनामी होऊ लागली होती, त्यामुळे ज्या रुग्णांना कोविड 19 ची लागण झाली आहे, अशा रुग्णांच्या मनात आत्महत्या आणि मरणाचे विचार येऊ लागले होते.

कोरोना रुग्णांचे समुपदेशन आणि जनजागृती-

रॉबर्ट गौडर व अस्लम शेख या दोघांनी व त्यांच्या टीमने या कोरोना बाधितांची ही समस्या ओळखली आणि या खचून गेलेल्या रुग्णांची मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार केला. कोरोना विषयीची समाजातजे समज गैरसमज होते, त्याबाबत जनजागृती करणे गरजेचे होते. त्यासाठी या तरुणांनी विषेश प्रयत्न करण्यास सुरुवात केली. सोलापूर शहरात असलेल्या सहा क्वारंटाईन सेंटरमध्ये जाऊन कार्यशाळा घेण्यास सुरुवात केली. क्वारंटाईन सेंटर मध्ये रुग्णांची कशा प्रकारे डॉक्टर काळजी घेत आहेत, आणि कोविड आजारातून लवकर बरे कसे होता येईल, याविषयी माहिती देण्यास सुरुवात केली.

रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अगोदर मानसिक स्तिथी किती महत्वाची आहे. नैराश्यातून बाहेर कसे पडता येईल याविषयी मार्गदर्शन केले. लहान मुले, तरुण, तरुणी यांना देखील विरंगुळा म्हणून नाच गाण्यांचा कार्यक्रम हाती घेतले, त्यांमध्ये आनंद निर्माण केला. कोरोनाला हरवण्यासाठी मानसिक बळ सर्वात महत्वाचे आहे, हेही त्यांना या तरुणांनी पटवून दिले.

प्रशासन व रुग्ण यांमध्ये गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न-

एखाद्या व्यक्तीस कोरोनाची लागण झाली असल्यास त्याच्या संपर्कातील सर्व व्यक्तींना क्वारंटाईन म्हणजेच 14 दिवस विलगीकरण कक्षात ठेवले जाते. यामधून अनेक रुग्ण प्रशासनावर आरोप करत, आम्हाला या ठिकाणी उगीचच आणले आहे. यामुळे समाजात आमची बदनामी होत आहे, अशा अनेक समस्या कोरोनामुळे प्रशासन आणि रुग्णांध्ये निर्माण झाल्या. मात्र, क्वारंनटाईन रुग्ण आणि नातेवाईकांचा हा गैरसमज दूर करून प्रशासन तुमच्यासाठी व समाजासाठी योग्य नियोजन करत असल्याची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न या तरुणांकडून करण्यात येत आहे.

सहा क्वारंटाईन सेंटर मधील हजारो रुग्णांची मानसिक तणावातून मुक्तता-

सोलापुरात सहा क्वारंटाईन सेंटर आहेत. यामध्ये शहर व जिल्ह्यातील हजारो रुग्णांना दाखल करण्यात आले. हे रुग्ण क्वारंटाईन सेंटरमध्ये मानसिकरित्या खचून जात होते. यासाठी प्रशासनाची परवानगी घेत, खचून गेलेल्या रुग्णांसाठी त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी समुपदेशनाचे कार्य हाथी घेतले. या तरुणांनी आतापर्यंत हजारो रुग्णांचे मन परिवर्तन केले आहे. क्वारंटाईननंतर आनंदी जीवन कसे जगता येईल यावर मार्गदर्शन करण्याचा या तरुणांनी प्रयत्न सुरू केला आहे.

Last Updated : Nov 18, 2020, 7:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details