सोलापूर - दहा महिन्यानंतर सोलापूर शहर व जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला आहे. मात्र, कोरोना महामारी अजूनही गेलेली नाही. 3 लाख एक हजार 533 विद्यार्थ्यांपैकी फक्त 92 हजार 169 विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली होती. शहर व जिल्ह्यातील बहुतांश शाळा सुरू झाल्या आहेत. 5 वी ते 8 वी पर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. यापूर्वी नोव्हेंबर 2020 मध्ये 10 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुरू झाले होते. बुधवारी शहरातील खासगी शाळांमध्ये मात्र विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाने हजेरी लावली होती.
माहिती देताना मुख्याध्यापक आणि पालक शहरातील 293 पैकी 267 शाळा सुरू-
महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी कादर शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील खासगी व मनपाच्या 293 पैकी 267 शाळा सुरू झाल्या. उर्वरित 26 शाळांमधील काही शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह तर काही शाळांची साफसफाई झाली नसल्याने त्या सुरू झाल्या नाहीत. यावेळी 55 हजार विद्यार्थ्यांपैकी 15 हजार 780 विद्यार्थी हजर होते. जानेवारी महिन्यापासून महानगरपालिका शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात समक्ष देऊन मार्गदर्शन केले होते. शहरातील अनेक शाळांनी गुलाबपुष्प देऊन, फुले उधळून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तसेच बुधवारी सोलापूर मनपा शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी 104 शाळांना भेटी दिल्या.
ग्रामीण भागातील सर्वच शाळा सुरू; मात्र विद्यार्थ्यांची दांडी
शहर व जिल्हा असे मिळून तीन लाख 1 हजार 533 पैकी फक्त 92 हजार 169 विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थिती दर्शवली. जवळपास 2 लाख 9 विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी शाळेला दांडी मारली होती. अक्कलकोट तालुक्यातील 300 शाळा सुरू झाल्या. बार्शी व करमाळा येथील 181 शाळा सुरू झाल्या. माळशिरस येथील 252 शाळा, मंगळवेढा येथील 117 शाळा, मोहोळ तालुक्यातील 145 शाळा, पंढरपूर येथील 194 शाळा ,सांगोला येथील 162, उत्तर सोलापूर तालुक्यातील 168 शाळा आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील 193 खासगी व सरकारी शाळा सुरू झाल्या होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी गावोगावी जाऊन शाळांना भेटी दिल्या आणि जनजागृती केली होती. मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांच्या सहमती आणि मदतीने पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. पण विद्यार्थ्यांची गैरहजेरी देखील मोठी होती.
24 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह
सोलापूर जिल्ह्यातील 8 हजार 458 शिक्षकांपैकी 8 हजार 384 शिक्षकांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्यापैकी 5 हजार 490 शिक्षकांचे रिपोर्ट प्राप्त झाले होते. त्यामध्ये 24 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत.
शहरातील कुचन हायस्कूलमध्ये गुलाबपुष्प देत विद्यार्थ्यांचे स्वागत
सोलापूर शहरात पूर्व विभागातील मुख्य शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुचन हायस्कुलमध्ये 5 वी ते 8 वी वर्गात विद्यार्थ्यांचा भरगोस प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती मुख्याध्यापक शरद पोतदार यांनी दिली. तब्बल दहा महिन्यानंतर शाळा सुरू झाल्याने कुचन शाळेतील शिक्षकांनी गुलाबपुष्प देत विद्यार्थ्यांचे स्वागत केले.