सातारा/सोलापूर - ऐन दिवाळीत दोन वेगवेगळ्या अपघातात 8 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. तर 19 जण जखमी आहेत. पुणे-सोलापूर महामार्गावर रुग्णवाहिकेचा अपघात झाला. या अपघातात 3 जण ठार झाले असून 13 जण जखमी झाले आहेत. मृत आणि जखमींना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दुसरा अपघात पुणे- बंगळुरू आशियाई महामार्गावर उंब्रज (ता.कराड) येथ झाला. तारळी नदीच्या पुलाचा कठडा तोडून ट्रॅव्हलर 50 फूट खोल नदीपात्रात कोसळली. यामध्ये ट्रॅव्हलरमधील 5 जण जागीच ठार झाले. तर सहा जण गंभिर जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावर रुग्णवाहिकेचा अपघात-
अपघातग्रस्त रुग्णवाहिका मृतदेह घेऊन तेलंगाणा राज्यात जात असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सहा जण रुग्णवाहिकेतून पुण्याहून हैद्राबादला जात होते. आज पहाटे 3 वाजता भरधाव वेगात असलेल्या रुग्णवाहिकेच्या चालकाला ताबा सुटला आणि रुग्णवाहिका समोर जाणाऱ्या ट्रकला धडकली.
यामध्ये रवी माणिक राठोड (वय 38 वर्ष, रा माळवाडी, वारजे, पुणे), बुद्धीबाई चण्णा पाळत्या (वय 48 वर्ष, रा माळवाडी, वारजे, पुणे) आणि चालकाचा जागीच मृत्यू झाला. चालकाची ओळख अद्याप पटलेली नाही.