सोलापूर- सोलापुरात 12 एप्रिल 2020 रोजी पहिला कोरोना रुग्ण आढळला आणि एकच भीतीदायक वातावरण शहरात निर्माण झाले. आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मनात धडकी भरली होती. पहिल्या रुग्णानंतर सोलापुरात हळूहळू कोरोना रुग्ण वाढत गेले. अशा कठीण प्रसंगी 108 रुग्णवाहिका सोलापुरात जीवनदायिनी ठरली. या रुग्णवाहिकेत काम करणाऱ्या डॉक्टरांच्या आणि रुग्णवाहिका चालकांच्या मनात मोठी भीती निर्माण झाली. अनेकांनी तर राजीनामे लिहून वरिष्ठांना सादर केले होते. पण यांचे समुपदेशन करून त्यांना वेळीच काम करण्याच्या सूचना दिल्या गेल्या. आज सद्यस्थितीत 108 रुग्णवाहिकेवर काम करणारे कर्मचारी आणि अधिकारी कोरोना योद्धे ठरले आहेत. कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेपासून ते दुसऱ्या लाटेपर्यंत या रुग्णवाहिकेने 30 हजार 767 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना उपचारासाठी क्वारंटाईन सेंटर आणि रुग्णालयात दाखल केले आहे.
राजीनामे देऊन जाणारे कर्मचारी आता मात्र कोविड योद्धे -
सोलापुरात एप्रिल 2020 मध्ये पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. त्याचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य प्रशासनाला कोविड पॉझिटिव्ह रिपोर्ट प्राप्त झाला होता. त्यामुळे सोलापुरातील स्थानिक प्रशासन हादरले होते. त्यांचे अंतिम संस्कार करण्यासाठी देखील कोणी पुढे आले नव्हते. त्यांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांना देखील क्वारंटाईन सेंटरमध्ये घेऊन जाण्यासाठी पुढे येत नव्हते. अशा कठीण प्रसंगी 108 रुग्णवाहिकेला फोन करण्यात आला. पण त्यांनी देखील पुढे येण्यास नकार दिला होता. कोरोना महामारीचा मोठा बाऊ झाला होता. 108 रुग्णवाहिकेवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अखेर राजीनामे देण्यास सुरुवात केली आणि काम सोडून जाण्याची पूर्ण तयारी केली होती. पण त्यांनी मन घट्ट करून हळूहळू मनातील भीती बाजूला केली आणि कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना रुग्णालयात पोहोचवणे आपल्या कामाचा अविभाज्य घटक समजून काम करण्यास पुन्हा सुरुवात केली. त्यामुळे आज 108 रुग्णवाहिका क्षेत्रात काम करणारे कर्मचारी, अधिकारी, डॉक्टर यांनी सोलापुरात कोविड योद्धा म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.