पुणे- राज्यात वाढत्या कोरोनाच्या पाश्वभूमीवर मोठ्या प्रमाणात राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजन न मिळाल्याने अनेक रुग्णांचे प्राणही गेल्याचे घटना राज्यभर घडत आहेत. राज्यात ऑक्सिजनची अशी परिस्थिती असताना पुण्यातील सौरभ आणि निलेश या दोन युवकांनी एकत्र येत 'ऑक्सिजन बँक' ही मोहीम सुरू केली आहे. ज्या गरजू रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे, अशा रुग्णांना हे दोन्ही मित्र तिथे जाऊन 12 लिटरचे ऑक्सिजन उपलब्ध करून देत आहेत. आतापर्यंत 100 हून अधिक कोरोनाग्रस्तांना मोफत ऑक्सिजन उपलब्ध करून दिले आहेत. दोघांच्या या मोहिमेत अनेकांनी त्यांना मदतीचा हात देत त्यांना हे ऑक्सिजन किट खरेदी करण्यासाठी पैसे उपलब्ध करून दिले आहेत.
शेकडो रुग्णांना मोफत ऑक्सिजन बँकेचे वाटप
राज्यात ऑक्सिजन अभावी रुग्ण दगावत असतील ते खूपच वाईट आहे. म्हणून या दोघांनी आपल्याला समाजासाठी काहीतरी करायचे आहे म्हणत सोशल मीडियाच्या माध्यमातून 'ऑक्सिजन बँक' ही मोहीम सुरू केली. सोशल मीडियाद्वारे आपल्या मित्रांना या 12 लिटर ऑक्सिजन किटसाठी मदत मागितली. त्यांच्या या आवाहनाला साथ देत त्यांच्या मित्रांनी देखील त्यांना मदत केली आणि त्यांनी 110 ऑक्सिजन किट खरेदी केले. त्यानंतर ज्या कोरोनाग्रस्तांना ऑक्सिजनची गरज भासत असे अशा रुग्णाच्या घरी जाऊन हे दोघे मित्र त्या रुग्णांना मदत करत असे. ऑक्सिजन गरज असताना अशा या छोट्याशा किटचा उपयोग या रुग्णांना होत आहे. त्यांना बेड मिळेपर्यंत याचा वापर देखील होत आहे. या दोघांच्या या ऑक्सिजन बँकच्या उपक्रमामुळे 100 हून रुग्णांना मदत झाली आहे.