पुणे- अवघ्या 15 दिवसांनी लग्न असलेल्या एका तरुणाचा अपघातात मृत्यू झाला आहे. पुण्यातील नवले पुलाजवळ बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. विराज प्रताप निकम ( वय २९, रा. मानव मंदिर सोसायटी धनकवडी, पुणे) या तरुणाचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर, त्याचा एक मित्र या अपघातात गंभीर जखमी झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, मृत विराज हा मित्र प्रितेशसोबत नऱ्हे येथील नवले पुलाजवळील सेवा रस्त्यावरून ऍक्टिवा गाडीवरून जात असताना डंपरच्या चाकाखाली चिरडला गेला. गंभीर जखमी झाल्याने नागरिकांनी त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर, मित्र प्रितेश प्रविण शहा ( वय २९) जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
१९ मार्च रोजी विराजचे लग्न होते. मित्रासोबतचे काम झाल्यानंतर तो आज कुटुंबीयांसोबत केळवणासाठी नातेवाईकांकडे जाणार होता. त्यामुळे घरातही सगळे त्याची वाट बघत होते. मात्र, तो प्रत्यक्ष जाण्यापूर्वीच त्याच्या मृत्यूची बातमी पोहचल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. लग्नाची तयारी पूर्ण झाली असताना प्रत्यक्ष नवरदेवाचाच करूण अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.