पुणे:वाकड येथे श्रावणाआधी आकाडीचा मांसाहार आणि पार्टी करणे एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे (Young man murdered). क्षुल्लक वादातून येथे आठ ते नऊ जणांनी एका तरुणाची चाकू भोसकून हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकूण ९ जणांना ताब्यात घेतले आहे. खंडू उर्फ दीपक गायकवाड असे खून झालेल्या १९ वर्षीय तरुणाचे नाव आहे. तर या वादात लखन लगस नावाचा तरुण जंभीर जखमी झाला आहे. जखमी झालेल्या तरुणावर खासगी रुग्णालयात उपचार आहेत. त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती वाकड पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रावण सुरु होण्याआधी गुरुवारी वाकड परिसरातील मुठा नदी लगत दोन गट मद्यपान करण्यासाठी बसले होते. यातील एका गटातील तरुणाने त्याच्यासोबत असलेल्या अल्पवयीन मित्राला सिगारेट आणि दारू आणायला सांगितली. तेव्हा, दुसऱ्या गटातील मयत खंडूने अल्पवयीन मुलाच्या कानशिलात लगावत तू लहान आहेस, माझ्या मित्राचा भाऊ आहेस. असे व्यसन करू नकोस. दारू, सिगारेट पिऊ नकोस असे सांगितलं. याचा राग मनात धरून दुसऱ्या गटातील तरुणांनी खंडू उर्फ दीपकचा धारदार चाकूने वार करून खून केला. या घटनेत आणखी एक तरुण जखमी झाला असून त्याची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.