पुणे : सतत वाढणाऱ्या महागाईवर चर्चा करणे हा जणू आपला छंदच आहे. दररोज आपण महागाईवर चर्चा करतोच पण, नुसतं चर्चा करून महागाई कमी होणार नाही हे सत्य आहे. पेट्रोल- डिझेलचे देखील भाव दररोज वाढत आहेत. आपल्याकडे असे अनेकजण आहेत की, ते फक्त चर्चा करत नाहीत बसत तर त्यावर मार्ग देखील शोधतात. असाच एक तरुण इंजिनियर पुण्यात आहे. ज्याच नाव आहे मयुर पाटील. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या महागाईवर ( Fuel Price Hike ) तोडगा म्हणून मयुरने एक असा एअर फिल्टर बनवला आहे, जो आपल्या गाडीच मायलेज मोठ्या प्रमाणात वाढवू ( Mileage Booster Air Filter ) शकतो. त्याचबरोबर हे एअर फिल्टर वापरून आपण एअर पोल्युशन देखील ४० टक्क्यांपर्यंत कमी करू शकतो. प्रती लिटर मागे आपल्या गाडीच मायलेज १० ते २० किलोमीटर वाढू शकते.
अशी सुचली कल्पना
मूलतः नाशिकचा असलेला हा तरुण पुण्यात इंजिनीरिंग करण्यासाठी आला आणि स्वतः कमाई करून एक बाईक घेतली. पण पेट्रोल इतकं महाग होत आहे बघून तो चिंतेत पडला. महागाईने त्रस्त झालेल्या या तरुणानं असं एक एअर फिल्टर बनवलं जे आपल्या गाडीच मायलेज हे १० ते २० किलोमीटर प्रती लिटर वाढवत .त्याचबरोबर देशात सध्या हवेचे प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणत वाढत आहे. मात्र मयुरने बनवलेल हे एअर फिल्टर ४० टक्क्यांपर्यंत प्रदूषण देखील कमी करत. २०१५ पासून मयूरने हे एअर फिल्टर बनवायचे काम सुरू केलं आणि अखेर त्यांन २०१८ मध्ये हे एअर फिल्टर बनवून तयार केलं. हे एअर फिल्टर आपण सगळ्याच गाड्यांमध्ये वापरू शकतो. त्याने बनवलेलं हे एअर फिल्टर वापरून आपण बुलेट सारख्या गाड्यांचंदेखील मायलेज वाढवू शकतो. आज मयुरने पुण्यात त्याचा स्वतःचा स्टार्टअप देखील सुरू केल आहे.