पुणे - कोरोनाच्या लढ्यात सर्व प्रशासन आपापल्या परीने प्रयत्न करत आहे. प्रत्येक चौकाचौकात पोलीस आपले कर्तव्य पार पाडत आहे. नागरिकांसाठी जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी लॉकडाऊन दरम्यान अनेक नागरिक तसेच सेवाभावी संस्था पुढाकार घेत आहेत. काही ठिकाणी मास्क वाटप, काही सॅनिटायझर तर काही जण हॅन्ड ग्लोव्हज् पुरवत आहेत. मात्र, पुण्यातील एका तरुणाने पोलिसांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदीक काढा तयार केला आहे. हा तरुण दररोज शहरातील पोलिसांसाठी औषधी काढा तयार करून विविध ठिकाणी बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलिसांना काढ्याचे वाटप करत आहे. मागील पंधरा दिवसांपासून त्याची ही सेवा अविरतपणे सुरू आहे.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पोलिसांना 'पोषक काढा'; पुण्यातला तरुणाचा अनोखा उपक्रम - pune lockdown
प्रत्येक चौकाचौकात पोलीस आपले कर्तव्य पार पाडत आहे. नागरिकांसाठी जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी लॉकडाऊन दरम्यान अनेक नागरिक तसेच सेवाभावी संस्था पुढाकार घेत आहेत. पुण्यात अशाच एका तरूणाने कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांसाठी आयुर्वेदिक काढा केला आहे.
रोज 50 ते 60 लिटर काढा बनवून तो साधारणत: 1200 कप काढा वाटतो. या कामात त्याला आई, वडील, बहीण, भाऊ मदत करत आहे. संपूर्ण कुटुंबच या सामाजिक कार्यात सहभागी झाले आहे. काढ्यात कोणत्याही औषधाचा वापर होत नाही. आलं, काळी मिरी, मीठ, लवंग, हळद , तुळस, पुदिना, लिंबू यांचा वापर करून आयुर्वेदिक काढा तयार करण्यात येतो. पाणी उकळून त्यामध्ये या पदार्थांचे मिश्रण टाकण्यात येते.
काढ्याचे सेवन केल्याने सर्दी, खोकल्यापासून संंरक्षण मिळते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढून त्याचा कोरोनाशी लढा देण्यात मदत होणार आहे. आपल्यासाठी रात्रंदिवस सेवा देण्याऱ्या पोलिसांना कोणत्याही रोगोचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी माझ्यावतीने एक छोटीसी मदत असल्याचे अभय जैन यांनी सांगितले.