पुणे- आतापर्यंत चहावर कारवाई झाल्याचे कधीच ऐकीवात नाही. परंतु, अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केल्याचे येवले अमृततुल्य हे पहिलेच नाव आहे. येवले चहामध्ये भेसळ असल्याचा अहवाल अन्न आणि औषध प्रशासनाने प्रसिद्ध केला. या चहामध्ये कृत्रिम रंगाचा वापर होत असल्याचे अहवालातून सिद्ध झाले. यानंतर येवले चहाचे संचालक नवनाथ येवले यांनी संबंधित प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.
गुणवत्तेच्या जोरावर लोकांनी येवले चहाला डोक्यावर घेतल्याचे त्यांनी सांगितले. तसेच चहाला ग्लॅमर मिळवून देण्याचं काम येवले अमृततुल्यने केले आहे. आमच्यामुळे अनेक चहा विक्रेत्यांनी आपल्या चहाच्या गुणवत्तेत सुधारणा केली असून ग्राहकांच्या आरोग्याला हानी पोहोचवणारे कोणतेही कृत्य आमच्याकडून होणार नसल्याचे स्पष्टीकरण संचालक नवनाथ येवले यांनी दिले आहे.
हेही वाचा -'मुंबई २४ तास' योजनेला मंत्रिमंडळाची मंजूरी - आदित्य ठाकरे
फूड सेफ्टी आणि स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या (FSSAI) गाईडलाईन नुसार रंगाचा वापर करणे गुन्हा असल्याची माहिती समोर आली. यावर बोलताना, आधी मेलामाईन, आता कलर, पुढे आणखी काय असेल, माहीत नाही, असे येवले म्हणाले. अन्न व औषध प्रशासनाच्या पहिल्या कारवाईच्या वेळी त्यांना काही त्रुटी आढळून आल्या होत्या. त्या त्रुटी आम्ही दूर केल्याची माहिती येवले यांनी दिली. त्यानंतर चहाचे नमुने प्रयोगशाळेत तपासण्यात आल्याचे ते म्हणाले. चहासाठी वापरत असलेले साहित्य चांगल्या दर्जाचे असल्याचे सांगण्यात आले. आज अचानक येवले चहामध्ये रंग मिसळत असल्याच्या बातम्या ऐकल्या. परंतु याविषयी आम्हाला अन्न व औषध प्रशासनाकडून कोणतीही नोटीस आली नसल्याची माहिती येवले यांनी दिली. तसेच चहात कोणत्याही प्रकारचा रंग मिसळण्यात येत नाही, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा -पुण्यातील प्रसिद्ध 'येवले चहा'मध्ये भेसळ असल्याचे सिद्ध
येवले अमृततुल्य चहाचे नाव जसेजसे मोठे होत आहे, तसे अनेकजण याचे श्रेय घेण्याच्या प्रयत्नात आहेत, असा आरोप येवले यांनी केला. कुठलाही व्यवसाय मोठा होत असताना अडचणी येत असतात. परंतु, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळून पैसे कमवणे आमचे उद्दिष्ट नाही, असे ते म्हणाले. परंतु ज्याप्रकारे येवले चहाविषयी अफवा पसरवल्या जात आहेत, याप्रकारचे कृत्य येवले चहाकडून होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.