पुणे - शैक्षणिक क्षेत्रात राज्याला अग्रेसर ठेवण्यासाठी सर्वजण मिळून एकत्रित समन्वयाने काम करूया, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ( Varsha Gaikwad On Maharashtra Education ) केले. पुण्यातील सिम्बॉयसिस विद्यापीठ येथे आयोजित शालेय शिक्षण विभागाच्या कार्यक्रमात त्या बोलत ( Varsha Gaikwad In Pune ) होत्या. यावेळी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, राजेश कृष्णा यांच्यासह शिक्षण विभागाचे संचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून राज्यात शैक्षणिक क्षेत्रात समन्वयातून चांगले कार्य सुरू आहे. विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी शालेय शिक्षण विभागात केलेले कार्य उल्लेखनीय आहे. शिक्षण विभागात कार्य करताना त्यांनी अत्यंत लहान बाबी विचारात घेत नियोजन केले आहे. शालेय शिक्षण विभाग एक कुटुंब आहे. राज्याच्या शैक्षणिक विकासासाठी हे कुटुंब सातत्याने कार्यरत आहे. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी प्रत्येकाचा सक्रीय सहभाग महत्त्वाचा आहे, असेही गायकवाड यांनी म्हटलं.