पुणे -लोकसंख्या वाढ रोखण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणून कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेकडे पाहिले जाते. शासन पातळीवरूनही त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होते. परंतु यंदा मार्च महिन्यापासून covid-19चा प्रादुर्भाव सुरू झाला आणि कुटुंब नियोजन कार्यक्रमालाही याचा फटका बसला. राज्यात याहीवर्षी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेमध्ये महिला आघाडीवर असल्याचे समोर आले आहे. यावर्षी राज्यात ऑक्टोबर महिन्यामध्ये तब्बल 52 हजार 353 महिलांनी नसबंदी शस्त्रक्रिया केली आहे तर हेच प्रमाण पुरुषांमध्ये फक्त 939 इतके आहे.
व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठका
Covid-19 आजाराच्या पार्श्वभूमीवर कुटुंबकल्याण कार्यक्रमांमध्ये कुठलाही अडथळा येऊ नये, यासाठी केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार कुटुंब कल्याण कार्यालयाकडून सामाजिक अंतराचे निकष व कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने घालून देण्यात आलेल्या सर्व अटी आणि नियमांचे पालन करून कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. कुटुंब कल्याण कार्यक्रम सुरळीत पार पडावा, यासाठी जून महिन्यापासून दर पंधरा दिवसांनी जिल्हा व मनपास्तरीय अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली जात होती.