पुणे -देहविक्रय करणाऱ्या बुधवार पेठेतील ९९ टक्के महिलांना कोरोना साथीमुळे आलेल्या मंदीत संधी मिळाली तर पर्यायी व्यवसाय, रोजगार करण्याची इच्छा आहे,असे 'आशा केअर ट्रस्ट' या संस्थेच्या सर्वेक्षणात आढळले आहे. लॉकडाऊनमुळे देहविक्री करणाऱ्या व्यवसायातील ८५ टक्के महिलांनी मालक, व्यवस्थापक आणि सावकारांकडून कर्ज घेतले आहे. मात्र आता ग्राहकच नसल्याने ते फेडायचे कसे, हा प्रश्न त्यांना भेडसावतो आहे.
लॉकडाऊन आणि त्यानंतरच्या अनलॉकच्या काळात बुधवार पेठेतील देहविक्रय करणाऱ्यांपैकी ९९ टक्के स्त्रिया उपजीविकेसाठी इतर पर्यायांचा शोध घेऊ लागल्या आहेत. 'आशा केअर ट्रस्ट' या देहविक्रय करणाऱ्या महिलांसाठी कार्यरत संस्थेच्या पाहणीतून ही बाब स्पष्ट झाली आहे. या संस्थेने केलेले सर्वेक्षण महापौर मुरलीधर मोहोळ यांना सादर करण्यात आले आहे आणि आवश्यक पावले उचलण्याची विनंतीही करण्यात आली.
बुधवार पेठ ही पुण्यातली सर्वात मोठी तर भारतातील दुसऱ्या क्रमांकाची देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांची वसाहत आहे. या भागात सुमारे सातशे कुंटणखाने आणि जवळपास ३ हजार देहविक्रेत्या स्त्रिया असल्याचे सांगितले जाते. यातल्या तीनशे स्त्रियांचा अभ्यास करण्यात आला. यातल्या ८७ टक्के महिलांनी सांगितले की, कोरोनाची साथ येण्यापूर्वीही त्यांना देहविक्रयातून कुटुंबाचे पालनपोषण करण्याइतपतही उत्पन्न मिळत नव्हते. मात्र शिक्षणाचा अभाव,रोजगाराच्या कौशल्यांची उणीव आणि परतीचे मार्ग खुंटल्यामुळे त्यांना या नरकात खितपत पडावे लागले आहे. कोरोनाच्या साथीनंतर मूळच्याच तुटपुंज्या उत्पन्नातही मोठी घट झाली. त्यामुळे आता अवस्था बिकट झाली आहे. त्यातूनच कर्जाचे ओझे वाढले आहे. परिणामी बहुतेक सर्वच स्त्रियांना पर्यायी काम-व्यवसायाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले आहे.
या महिलांपैकी ८२ टक्के महिला २५ ते ४५ या वयोगटातील आहेत. ८४ टक्के महिला अशिक्षित आहेत. त्यातील १६ टक्के मुलींना शालेय शिक्षण पूर्ण होण्याआधीच ते सोडून या व्यवसायात ढकलले गेले. ८४ टक्के महिलांना या परिस्थितीत देहविक्रय करण्याची भीती वाटते. मात्र, कुंटणखाना चालकांकडून येणाऱ्या दबावामुळे आणि उपजीविकेच्या प्रश्नामुळे पर्याय राहत नाही. ६८ टक्के महिलांना वाटते की, व्यवसाय पुन्हा तग धरेल. संधी मिळाली तर, पर्यायी काम करण्याची ९९ टक्के महिलांची तयारी आहे. यातील काही महिला तर मिळेल ते काम करायला तयार आहे. आम्ही ज्या अंधारातून गेलो आहोत, तो अंधार आमच्या मुलांच्या आयुष्यात येऊ नये, म्हणून मुलांच्या भवितव्यासाठी यातील काही महिला पर्यायी काम करायलाही तयार झाले आहेत.
हेही वाचा -यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून पुण्यात बहीण भावाने छापल्या शंभर रुपयांच्या बनावट नोटा
'मला या व्यवसायात १० वर्ष झाली आहे. आधी पैसे मिळत होते. त्या पैशातून घरी आणि काही स्वतःसाठी ठेवत होते. पण लॉकडाऊनमध्ये सर्व काही बंद झाल्यांनतर खूप हाल होत होते. कधी एक वेळेचे जेवण मिळत होते तर, कधी उपाशीच राहावे लागत होते. घराचे भाडेही द्यायला पैसे नव्हते. कोणाकडून तरी व्याजाने पैसे घेऊन लॉकडाऊनचे पाच महिने काढले. त्यानंतर अनलॉकमध्ये काहीतरी पैसे मिळतील, ही अपेक्षा होती. पण आजही खूप कमी पैसे मिळत आहेत. कोणाकडे काहीही काम असेल तर, ते काम करेन. पण आता येथे थांबावेसे वाटत नाही,' अशी भावनिक साद एका महिलेने यावेळी दिली.