आजारी मुलासमोरच महिलेची केईएम रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
पुण्याच्या केईएम रुग्णालयात महिलेने पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. महिलेने उपचार सुरू असलेल्या १३ वर्षीय मुलासमोरच आत्महत्या केली.
पुणे - केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या 13 वर्षीय मुलासमोरच आईने पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास घडली. यासना मुकेश बकसानी (वय ३६) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी या महिलेने सुसाईड नोट लिहिली असून त्यात कोणाविषयी तक्रार नसल्याचे म्हटले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यासना मुकेश बकसानी यांच्या पतीचे तीन महिन्यांपूर्वी कॅन्सरमुळे निधन झाले आहे. त्यांचा मुलगा गर्व बकसानी याला किडनी आणि डायबिटीजचा आजार आहे. केईएम हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. त्याची आई आणि आजी दवाखान्यात त्याच्यासोबतच होते. दरम्यान, रात्री चार वाजताच्या सुमारास मुलगा गर्व याला त्रास होऊ लागला. त्यामुळे यासना यांनी गर्वच्या आजीला डॉक्टरला बोलावून आणण्यास सांगितले. आजी बाहेर जाताच यासना यांनी पाचव्या मजल्यावरून खाली उडी मारली. यावेळी गर्वने आईला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यासना यांनी काही न ऐकता पाचव्या मजल्यावरून खाली उडी मारली.
दरम्यान महिलेने उडी मारल्याचे लक्षात येताच रुग्णालयात एकच धावपळ उडाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या यासना यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. माहिती मिळाल्यानंतर समर्थ पोलिसानी घटनास्थळी भेट दिली. पुढील कारवाई सुरू आहे.
या महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठी लिहून ठेवली आहे. यामध्ये तिने कुणालाही जबाबदार धरले नाही. पोलिसांनी ही चिट्ठी जप्त केली असून अधिक तपास सुरू आहे.