पुणे - बीबीएच्या दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेणाऱ्या 21 वर्षीय तरुणीने आईचे व्हॉट्सअॅप अकाऊंट हॅक करत तिचे आणि एका 42 वर्षीय व्यक्तीचे फोटो आणि व्हिडीओ मिळवले. ते फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन आईच्या प्रियकराकडे 15 लाखाची खंडणी मागितली. खंडणीतील एक लाख रुपये स्वीकारताना पोलिसांच्या मुलगी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने हा प्रकार उघडकीस आणला. मिथुन मोहन गायकवाड (वय 29) आणि प्रियंका क्षीरसागर (वय 21) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दोघांनाही न्यायालयात हजर केले असता आठ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
याप्रकरणी एका 42 वर्षीय व्यक्तीने याप्रकरणी तक्रार दिली असून विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. या महिलेच्या मुलीला दोघांवर संशय होता. या दोघांच्या प्रेमसंबंधाचा पर्दाफाश करण्यासाठी मुलीने स्वतःच्या आईचे व्हाट्सअप हॅक केले. त्यातून तिने स्वतःची आई आणि तक्रारदार व्यक्तीचे एकत्र असलेले फोटो, व्हिडीओ मिळवले. हेच फोटो व्हिडिओ तिने आपल्या प्रियकराला दाखवले. त्यानंतर या दोघांनाही मिळून तक्रारदार व्यक्तीकडून खंडणी उकळण्याचा कट रचला.