पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात थुंकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून सार्वजनिक रस्त्यावर थुंकणाऱ्या व्यक्तींमुळे संसर्ग वाढण्याची भीती असते. याच पार्श्वभूमीवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. थुंकणाऱ्या व्यक्तीला 1 हजार रुपयांचा दंड केला जात आहे, अशी माहिती पालिका अधिकारी सुनील शिर्के यांनी दिली आहे.
निर्बंध लागू
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्यादृष्टीने उपयोजना केल्या जात आहेत. गर्दीच्या ठिकाणी मास्क अनिवार्य असून शहरात अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आता थेट रस्त्यावर थुंकणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जात असून संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिकेकडून प्रयत्न केला जात आहे.
होऊ शकतो कोरोनाचा संसर्ग
सार्वजनिक रस्त्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून महानगरपालिकेकडून भरारी पथक तयार करण्यात आली आहेत. शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये थांबून नागरिकांनी थुंकल्याचे निदर्शनास येताच थेट कारवाई केली जात आहे. शहरातून दिवसभरात शेकडो ठिकाणी कारवाई केली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तर, दंडात्मक कारवाई करण्यात आलेल्या सोनीलाल यांनी नागरिकांनी सार्वजनिक रस्त्यावर थुंकू नये, असे आवाहन केले आहे.