पुणे - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आमच्या आमदारांना अंधारामध्ये चोरून का भेटतात?,असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विचारला आहे. विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक रविवारी पुण्यामध्ये पार पडली. या बैठकीनंतर जयंत पाटील पत्रकारांशी बोलत होते.
जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 10-10 जागा निवडून येतील, असे भाकीत केले आहे. त्यांनी आमच्या इतक्या मोठ्या प्रमाणावर जागा निवडून येण्याचे भाकीत केल्यामुळे मी त्यांचा आभारी आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक लढवण्यात येणार आहे. मात्र, शिवसेनेकडून प्रशांत किशोर यांच्यासारखा सल्लागार नेमून नवीन चेहरा समोर आणण्याचा प्रयोग केला जात आहे. त्यामुळे भाजप-सेना युतीकडून विधानसभा निवडणूक ही केवळ त्यांच्यामध्ये लढवण्यात येणार असल्याचे चित्र निर्माण करण्यात येत आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे राज्यातून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी 800 इच्छुक उमेदवारांचे अर्ज आले आहेत. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे, असेही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले आहे.