पुणे -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल पुणे दौऱ्यावर होते. सकाळी 11 वाजता सुरू झालेला दौरा रात्री एक वाजून 14 मिनिटापर्यंत चालला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुणे दौरा हा तब्बल 14 तासांचा ( Eknath Shinde visit to Pune ) दौरा होता. यात त्यांनी विविध बैठका घेतल्या. तसेच विविध कार्यक्रमांना हजेरी देखील लावली. या दौऱ्याबाबत त्यांना विचारलं असता ते म्हणाले की, मी पुणेकरांना मी मनापासून धन्यवाद देतो. त्यांनी माझं स्वागत हे जल्लोषात केलं असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटल आहे.
असा होता शिंदे यांचा दौरा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात पाऊस, अतिवृष्टी, पीक-पाणी तसेच विकास कामांचाआढावा घेतला. त्यांनतर दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर दुपारी 2 च्या सुमारास फुरसुंगी पाणी योजना प्रकल्पास भेट देत पाहणी केली. 3 वाजल्याच्या सुमारास सासवड येथे शिवसेना पक्षाची जाहीर सभा झाली, त्यात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री हजर होते. सासवड येथे माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या घरी राखीव. त्यांनतर साडेचार वाजेच्या सुमारास खंडोबा जेजुरी देवस्थान येथे भेट दिली. 7 वाजता हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदान उद्घाटन समारंभ, हडपसर उद्यान येथील कार्यक्रमास उपस्थिती लावली.
त्यानंतर साडे आठ ते नऊ वाजता आमदार तानाजी सावंत यांचे निवासस्थान येथे भेट दिली. त्यानंतर शंकर महाराज मठ धनकवडी येथे आगमन झाले. रात्री साडे दहाच्या सुमारास श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंदीर, दत्त मंदीर येथे महाआरती करण्यात आली. रात्री 11 वाजता गणेश मंडळ, नवरात्र उत्सव मंडळ यांची आगामी उत्सवासंदर्भात पुणे पोलीस आयुक्त कार्यालय येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. मध्यरात्री दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, खासदार गिरीश बापट, डॉ. प्रकाश आमटे, शिवसेना आमदार अनिल बाबर यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.