पुणे - मुंबई-पुणेसारख्या महानगरांमध्ये वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब आहे. पुणे शहराचा विचार केला तर पुण्यातल्या वाहतूक कोंडीला अजूनही प्रशासनाकडे उत्तर नाही. पुणे शहराचा झपाट्याने विकास होतो आहे. एकीकडे शहराचा हा विकास केवळ बांधकामांपुरता मर्यादित आहे की काय? अशी अवस्था दिसून येते. शहरात वाढणाऱ्या बांधकामांमुळे केवळ बकालपणा वाढलेला दिसतो आहे. ही वाढ होत असताना आवश्यक असलेल्या साधन सुविधांचा अभावच अनेक ठिकाणी जाणवतो आणि तीच बाब शहराच्या वाहतुकीच्या संदर्भात देखील आढळून येते. एकेकाळी पुणे शहराची ओळख ही दुचाकींचे शहर अशी होती. मात्र गेल्या काही काळात शहरात चारचाकीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
शहर झपाट्याने वाढत असताना वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच बाब शहराच्या विविध उपनगरांमध्ये तसेच आयटी हब असलेल्या हिंजवाडी परिसरात पाहायला मिळत आहे. या वाहतुकीवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाकडून नवीन रस्ते बांधणे, फ्लायओव्हर बांधणे असे नेहमीच प्रयोग केले जातात. मात्र पुणे शहरातल्या या वाहतूक कोंडीवर उपाय करायचा असेल तर सध्याची असलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही अधिक बळकट अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचे मत या क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करतात.
सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची गरज
पुणे शहरात सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने मोठ्या प्रमाणात लोक स्वतःच्या दुचाकी, चारचाकी गाड्या वापरतात. या गाड्या रस्त्यावर आल्याने सहाजिकच वाहतूक कोंडी ही शहराच्या विविध भागात पाहायला मिळते. तसेच गेल्या काही काळात आर्थिक स्थिती सुधारल्याने दुचाकी आणि चार चाकी घेणाऱ्यांचे प्रमाण देखील शहरात वाढले आहे. त्याचा परिणाम रस्त्यावर येणाऱ्या वाहनांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येते. त्यामुळे वाहतुकीचे नियोजन करताना ते वाहन केंद्रित नियोजन न करता नागरिक केंद्रित नियोजन केले पाहिजे. जेणेकरून नागरिकांचा विचार या वाहतूक नियोजनामध्ये झाला पाहिजे. मात्र तसे होताना दिसत नाही. प्रशासन हे वाहन केंद्रित नियोजन करू पाहत जे आवश्यक नसल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्यांना वाटते.
वॉक, बस, सायकल या त्रिसूत्रीचा वापर गरजेचा