पुणे -उद्यापासून सर्वत्र नवरात्र उत्सवाला सुरवात होत आहे. नवरात्रबरोबर येतो उत्साह आणि उत्सव. नऊ दिवसांच्या उत्सवात देवी दुर्गाच्या नऊ स्वरुपांची पूजा केली जाते. शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस सर्वात महत्त्वाचा असतो. कारण, त्या दिवशी घटस्थापना होते. घटस्थापना म्हणजे काय या बाबत ईटीव्ही भारतने पंडित वसंतराव गाळगीळ यांच्याकडून माहिती जाणून घेतली.
पंडित गाळगीळ म्हणाले..
घटस्थापनेचा शाब्दिक अर्थ म्हणजे घट वाढणे. नवरात्री दरम्यान इतर विधींमध्ये घटस्थापना सर्वात महत्त्वाची विधी आहे. घटस्थापना नवरात्रीच्या पहिल्या दिवशी केली जाते. घटस्थापना देवी शक्तीचे आव्हान आहे. ते नियम, मार्गदर्शक तत्वे आणि वेळ प्रदान करणाऱ्या शास्त्रानुसार केले पाहिजे. घट म्हणजे, कलश आणि कलश म्हणजेच वरुण देवता. सागर आणि नद्यांनी जे आपले विश्व भरले आहे, त्याची देवता म्हणजे वरुण देवता. वरुण देवता ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणाला आपण कलश म्हणतो. कोणत्याही देवाची पूजा ही कलश पूजेशिवाय होत नाही. कलशाच्या पूजेच्या वेळेस आपली श्रद्धा अशी असते की आपल्या पवित्र सगळ्या नद्या सगळी सागराची तीर्थ त्या घटात येऊन राहतात. घट म्हणजे मातीचा घडा. श्रीमंत लोकांनी तो सोने, चांदी, पितळेचा घडा केला. परंतु, माती ही सर्वात श्रेष्ठ आहे आणि तिचा घडवलेला घडा म्हणजे कलश आणि त्याची स्थापना करून सकाळी उठल्यावर सूर्योदयापासून तीन तासांच्या आत म्हणजेच, साडेसात ते साडेनऊमध्ये पाहिल्या प्रवर्गात सर्वांनी घटस्थापना करावी, अशी माहिती पंडित वसंतराव गाळगीळ यांनी दिली.