पुणे- इस्लाम धर्माचे सर्वश्रेष्ठ असे हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती म्हणून ईद-ए-मिलाद साजरी केली जाते. हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्म रबीउल अव्वल महिन्याच्या बारा तारखेला साजरा करण्यात येतो. सन 571 ला हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्म मक्का येथे झाला. मोहम्मद पैगंबर हे अल्लाहचे अंतिम प्रेषित होते. इस्लामच्या धारणेनुसार अल्लाहने त्यांच्यामार्फत कुराण हा धर्मग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवला. त्यामुळे त्यांना नबी रसूल आदी नावांनीही संबोधित केले जाते. इस्लाम मध्ये ईद-ए-मिलाद हा सर्वात मोठा दिवस असल्याचे मानला जाते.
ईद-ए-मिलाद म्हणजे काय? मोहम्मद पैगंबर यांनी दिला शांततेचा संदेश ईद-ए-मिलादचा इतिहास -
रबीऊल अव्वलच्या बाराव्या दिवशी मोहम्मद पैगंबर यांचा जन्म मक्का येथे झाला. हा दिवस मुस्लिम समुदायाकडून मोठ्या उत्साहात ईद-ए-मिलादुन्नबी नावाने साजरा केला जातो. ईद या शब्दाचा अर्थ आनंद असा आहे. या दिवशी अन्नाच्या स्वरूपात दान केले जाते. इस्लाम धर्मातील मान्यतेनुसार पैगंबर हजरत महंमद हे अखेरचे संदेशवाहक आणि सर्वात महान होते. हजरत मोहम्मद पैगंबर यांना खुद्द अल्लाहने देवदूत जिब्राईल द्वारे कुरान चा संदेश दिला होता. हजरत मोहम्मद पैगंबर यांनी नेहमी शांततेचा संदेश दिला. त्यामुळे मुस्लिम बांधवांमध्ये त्यांच्याबद्दल आदराची भावना आहे.
काय आहे परंपरा -
ईद-ए-मिलाद निमित्त मुस्लिम बांधव मशिदीमध्ये यानिमित्ताने विशेष प्रार्थना करतात. या दिवसात रात्रभर प्रार्थना सुरू असते. मोहम्मद पैगंबर यांच्या प्रतिकात्मक पावलांच्या निशाणावर प्रार्थना केली जाते. तसेच मोहम्मद पैगंबर यांनी दिलेल्या शिकवणीचे स्मरण देखील करतात. तर काही ठिकाणी भव्य मिरवणुका निघतात. नमाज अदा करून खास मेजवानीचा बेत असतो. मात्र यंदा देखील कोरोनामुळे सणाचं स्वरूप बदललेलं आहे. या सणाच्या निमित्ताने नागरिक नमाज अदा करून गोरगरिबांना मदत करणे त्याच पद्धतीने कुराण पठण करतात.
विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन -
मोहम्मद पैगंबर यांनी त्यांच्या आयुष्यात नेहमीच शांततेचा संदेश दिला आहे. सत्य आणि अहिंसेची शिकवण ही नेहमीच मोहम्मद पैगंबर यांनी दिली आहे. त्यांच्या या शिकवणीची आठवण आणि त्यांनी दिलेल्या कुराणची शिकवण ही सर्वसामान्य नागरिकांच्या लक्षात राहावी आणि त्यांनी आपल्या जीवनात ती अमलात आणावी यासाठी या दिवशी त्याचे पठण आणि शिकवण दिली जाते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक रद्द झाली असली तरी ईदच्या दिवशी रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर अशा शिबिरांचे आयोजन देखील करण्यात येत आहे.