महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Diwali 2021 : काय आहे धनत्रयोदशीच्या मागची पौराणिक कथा? जाणून घ्या...

धनत्रयोदशी या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला. म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. काही लोक या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करतात. दिवाळी सण असताना धनत्रयोदशीस एक आगळेवेगळे स्वरूप येते.

dhanteras latest news
dhanteras latest news

By

Published : Nov 2, 2021, 7:15 AM IST

पुणे -धनतेरस किंवा धनत्रयोदशी या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला. म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. काही लोक या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करतात. दिवाळी सण असताना धनत्रयोदशीस एक आगळेवेगळे स्वरूप येते.

धनत्रयोदशीबद्दल अजून एक दंतकथा आहे. इंद्राने जेव्हा असुरांना बरोबर घेऊन समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून या दिवशी देवी लक्ष्मी प्रगट झाली. त्याच वेळी समुद्रातून धनवंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धनवंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. म्हणून या दिवसास धनवंतरी जयंती असेही म्हणतात. या दिवसाला बोलीभाषेत ‘धनतेरस’ असे म्हटले जाते. या दिवशी व्यापारी तिजोरीचे पूजन करतात. व्यापारी वर्ष दिवाळी ते दिवाळी असे असते. नव्या वर्षाच्या हिशोबाच्या वह्या या दिवशीच आणून त्यांचे पूजन करून वापरात आणल्या जातात. धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन सुवर्ण विकत घेण्याचा प्रघात आहे. त्यामुळे वर्षभर घरात धनलक्ष्मी वास करते. वास्तविक लक्ष्मीपूजनाच्या वेळी वर्षभराचा आयव्यय (जमाखर्च) द्यायचा असतो. त्या वेळी धनत्रयोदशीपर्यंत शिल्लक राहिलेली संपत्ती प्रभुकार्यासाठी व्यय केल्यास सत्कार्यात धन व्यय झाल्यामुळे धनलक्ष्मी शेवटपर्यंत लक्ष्मीरूपाने रहाते. धन म्हणजे पैसा. हा पैसा घामाचा, कष्टाचा, धवलांकित असलेला आणि वर्षभरात पै-पै करून जमा केलेला असावा. या पैशाचा न्यूनतम १/६ भाग प्रभुकार्यासाठी व्यय करावा, असे शास्त्र सांगते.

प्रतिक्रिया

पूर्वी राजे वर्षाच्या शेवटी आपला खजिना सत्पात्री दान करून खाली करायचे. तेव्हा त्यांना धन्यता वाटायची. यामुळे जनता आणि राजा यांच्यातील संबंध हे कौटुंबिक स्वरूपाचे होते. राजाचा खजिना हा जनतेचा असून राजा त्याचा केवळ सांभाळ करणारा आहे. त्यामुळे जनता कर देतांना आडकाठी न करता देत असे. त्यामुळे साहजिकच परत खजिना भरत असे. ‘सत्कार्यासाठी धनाचा विनियोग झाल्यामुळे आत्मबलही वाढत असे.

कसा झाला धनवंतरीचा जन्म -

‘धनवंतरीचा जन्म देव आणि राक्षस यांनी केलेल्या समुद्रमंथनातून झाला. चार हात असलेला भगवान धनवंतरी एका हातात ‘अमृत कलश’, दुसर्‍या हातात ‘जळू’, तिसर्‍या हातात ‘शंख’ आणि चौथ्या हातात ‘चक्र’ घेऊन जन्माला आला. या चारही हातांतील गोष्टींचा उपयोग करून अनेक व्याधींना, रोगांना बरे करण्याचे काम भगवान धनवंतरी करतो. वैद्य मंडळी या दिवशी धनवंतरीचे (देवांचा वैद्य) पूजन करतात. कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे आणि साखर असे ‘प्रसाद’ म्हणून लोकांना देतात. यात मोठा अर्थ आहे. कडुनिंबाची उत्पत्ती अमृतापासून झाली आहे. धनवंतरी हा अमृततत्व देणारा आहे. हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची पाच-सहा पाने प्रतिदिन खाल्ली, तर व्याधी होण्याची शक्यता नाही. एवढे कडुनिंबाचे महत्त्व आहे; म्हणून या दिवशी तोच धनवंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.

यमदीपदान : प्राण हरण करण्याचे काम यमराजाकडे आहे. मृत्यू कोणालाच चुकला नाही आणि चुकवता येत नाही; पण अकाली मृत्यू कोणालाच येऊ नये, याकरिता धनत्रयोदशीस यमधर्माच्या उद्देशाने कणकेचा तेलाचा दिवा (तेरा दिवे) करून तो घराच्या बाहेरच्या बाजूस दक्षिणेला तोंड करून सायंकाळी लावावा. एरव्ही दिव्याचे तोंड दक्षिणेस कधीही नसते, केवळ या दिवशी तेवढे दिव्याचे तोंड दक्षिणेस करून ठेवावे. त्यानंतर पुढील मंत्राने प्रार्थना करावी.

मृत्युना पाशदंडाभ्यां कालेन श्यामयासह ।
त्रयोदश्यांदिपदानात् सूर्यजः प्रीयतां मम ।।

अर्थ : धनत्रयोदशीला यमाला केलेल्या दिव्याच्या दानाने प्रसन्न होऊन त्याने मृत्यूपाश आणि दंडातून माझी सुटका करावी.

यमदीपदान सूर्यास्तानंतर करणे म्हणजेच साधारणपणे सायंकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत करणे. याला लाभाच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे. नंतरचा काळ गौण भाग आहे. गौण भाग जरी असला, तरी त्या वेळेत सुद्धा यमदीपदान करू शकतो.

‘धनत्रयोदशीला श्री लक्ष्मीतत्व पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात येते. या दिवशी श्री लक्ष्मीची पूजा करतांना सध्या लोक पैसे (नाणी, नोटा), दागिने या स्वरूपात करतात. या कारणाने श्री लक्ष्मीची कृपा खर्‍या अर्थाने त्यांना प्राप्त होईल हे सांगता येणार नाही. केवळ स्थूल धनाचे पूजन करणारा जीव मायेच्या पाशात अडकतो आणि ‘साधना करून मोक्ष मिळवणे’, हा मनुष्यजन्माचा मूळ उद्देश विसरतो. या दिवशी श्री लक्ष्मीचे ध्यान आणि शास्त्र संमत पद्धतीने पूजन करणे अपेक्षित असते.’

धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. कथित भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुख उपभोगावीत म्हणुन राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चवथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. ती त्यास वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या जगात(यमलोकात) परततो. अशा प्रकारे तिने राजकुमाराचे प्राण वाचवले. म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात.त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यू टळतो असा समज आहे.

हेही वाचा -Diwali 2021 : धनत्रयोदशीला का करतात दागिने आणि भांड्यांची खरेदी? काय आहे त्याचे महत्त्व? जाणून घ्या...

ABOUT THE AUTHOR

...view details