महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यात नदीजोड प्रकल्पाला गती देणार, 'वॉटर कप' स्पर्धेच्या बक्षीस वितरणावेळी मुख्यमंत्र्यांची माहिती - paani foundation

'वॉटर कप स्पर्धा 2019' च्या तालुका व राज्यस्तरीय पारितोषिकांचे वितरण रविवारी बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल मध्ये झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधला.

water cup 2019 prizes distributed in pune cm fadnavis attended via video conferencing

By

Published : Aug 11, 2019, 10:10 PM IST

पुणे - महाराष्ट्रात पुराची स्थिती असली तरी दुष्काळमुक्तीचा प्रवास सुरूच ठेवावा लागेल. त्या दृष्टीने नदीजोड प्रकल्पाला गती देण्याचे नियोजन सरकारने केले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

'वॉटर कप २०१९' स्पर्धेचे विजेते गाव 'सुर्डी'

'वॉटर कप स्पर्धा 2019' च्या तालुका आणि राज्यस्तरीय पारितोषिकांचे वितरण रविवारी बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल मध्ये पार पडले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधला.

या कार्यक्रमाला अभिनेता आमिर खान, रिलायन्स फाउंडेशनचे सचिन मर्डीकर, एच. टी. पारेख फाउंडेशनच्या झिया लाल, पिरामल फाउंडेशनचे आर. चंद्रशेखर, टाटा ट्रस्टचे पवित्रकुमार आणि बजाज फाउंडेशनचे अरविंद जोशी उपस्थित होते.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एकीकडे दुष्काळाला हटविण्यासाठी काम करणाऱ्या जलयोद्ध्यांचा व जलमित्रांचा सत्कार होत असताना, अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाल्याचे दु:ख आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील अनेक भागात हिच परिस्थिती आहे. त्यांना मदत करण्यासाठी आम्ही शक्य ते प्रयत्न करत आहोत, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

यावेळी आमिर खान म्हणाले की, पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने पाणलोट क्षेत्रात मोठे काम झाले आहे. तसेच, लोकांमध्ये जलसंवर्धनाबाबत जनजागृती आली आहे. आमच्या दृष्टीने भाग घेणारी सर्व गावे ही विजेतीच आहेत. दुष्काळाला आपण अजून हरवलेले नाही. आपण गाफील राहिलो तर दुष्काळ परत येऊ शकतो. मात्र, हा मार्ग सोपा नाही. पाणलोट कामासोबतच माती, गवत आणि पीक नियोजनावर काम करावे लागेल. तेव्हाच आपण दुष्काळाला पूर्णपणे हरवू शकू, असेही आमिर खान म्हणाले.

पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत, सोलापूर जिल्ह्यातील 'सुर्डी' (ता. बार्शी) या गावाला 75 लाख रुपयांचे पहिले पारितोषिक मिळाले. अहमदनगर जिल्ह्यातील 'पिंपरी जलसेन' (ता. पारनेर) आणि सातारा जिल्ह्यातील 'शिंदी खुर्द' (ता. माण) या गावांनी संयुक्तपणे दुसरा क्रमांक आणि 50 लाख रुपयांचे पारितोषिक मिळवले. तर, जळगाव जिल्ह्यातील 'आनोरे' (ता. अंमळनेर), वाशिम जिल्ह्यातील 'बोरव्हा खुर्द' (ता. मंगरूळ पीर) आणि बीड जिल्ह्यातील 'देवऱ्याची वाडी' (ता. बीड) या गावांना 40 लाख रुपयांचे तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details