पिंपरी चिंचवड:वारकरी संप्रदाय ही मोठी शक्ती असून या संप्रदायाने भजन व किर्तनाच्या माध्यमातून मानवकल्याण आणि विश्वशांतीचा संदेश दिला आहे. मानवाला सद्विचार देणारा वारकरी संप्रदाय महाराष्ट्राचे वैभव आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांनी केले आहे.
वारकरी संप्रदाय हे महाराष्ट्राचे वैभव यांची उपस्थिती मृदंग ज्ञान शिक्षण संस्था आळंदी आयोजित संत दासोपंत स्वामी आळंदीकर यांचा गुरुपूजन सोहळा, संस्थेचा रौप्य महोत्सव सोहळा आणि मृदंग दिंडी महोत्सव प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे, आमदार दिलीप मोहिते, महेंद्र थोरवे, मारोती महाराज कुरेकर, दासोपंत स्वामी आळंदीकर, महंत पुरुषोत्तम दादा महाराज, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, महाराष्ट्राला महान संत परपरा आणि वारकरी परंपरा लाभली आहे. ज्ञानोबा माऊली, जगद्गुरू तुकाराम महाराजांसारख्या महान संतांची परंपरा हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य आहे. अन्य कुठल्याही प्रांताला हे भाग्य लाभले नसेल. म्हणून आपण सर्व भाग्यवान आहोत. वारकरी परंपरेत भजन, किर्तनाला मोठे स्थान आहे. ही एक ज्ञान आराधना असून त्यात भक्ती आणि ज्ञानोपासनेचा संगम आहे. विश्वशांती आणि मानवकल्याणाचा संदेश दिला जातो.
वारकरी संप्रदायाकडून समाजात सकारात्मकता पेरण्याचे कामभजन, किर्तनात अभंग, ओव्या, भारुड याचा अर्थ उलगडून सर्वसामान्य माणसाला कळेल अशा सोप्या भाषेत पोहोचवले जाते. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून मानसिक समाधान मिळते. चांगली ऊर्जा मिळते. मनातील राग, लोभ, द्वेष, मत्सर बाजूला सारला जाते. जीवनातील नकारात्मकता घालवून त्याठिकाणी सकारात्मकता पेरण्याचे, मन ताजेतवाने करण्याचे काम किर्तन प्रवचनाने होते. समाजप्रबोधनाच्या माध्यमातून माणसाच्या मनात चांगले विचार बिंबविण्याचे कार्य वारकरी संप्रदाय करतो. आपल्या आयुष्यात पांडुरंगाची पूजा करण्याची संधी मिळाली. तो दिवस आयुष्यातला सर्वात महत्वाचा दिवस होता, असे त्यांनी सांगितले आहे.
पंढरपूरसह देहू आळंदीच्या विकासावरही भरमुख्यमंत्री पद वारकरी, शेतकरी, कष्टकरी, कामगार, शोषित पिडीत लोकांच्या कल्याणासाठी वापरून राज्याचा सर्वांगिण विकास करायचा आहे, असे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले. पंढरपूरचा विशेष कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वारकऱ्यांना सर्व सुविधा मिळाव्यात आणि परिसर स्वच्छ रहावा, यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. देहू आळंदीचा देखील याच पद्धतीने विकास करायचा आहे. याठिकाणी लाखो भाविक येतात. येथे येणाऱ्या वारकऱ्यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यात येतील. इंद्रायणी नदी स्वच्छ करण्यासाठी प्रशासनाला सुचना करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले आहे.
मृदंग ज्ञान शिक्षण संस्थेत अनेक शिष्य मृदंग वादनाचे शिक्षण घेत आहेत. कर्नाटक, आंध्र प्रदेशातही या संस्थेचे शिष्य भजन किर्तनाला साथसंगत करत आहेत. ही कौतुकास्पद बाब असल्याचे शिंदे म्हणाले. कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्र्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यांनी मृदंग दिंडीमध्ये पायी चालत सहभाग घेतला आहे.