पुणे-एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या टोळीच्या वाकड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून दोन पिस्तुल, तीन जिवंत काडतुसे, कोयता, मिरचीपूड लोखंडी रॉड अशी घातक शस्त्रे मिळाली आहेत.
आरोपींकडून दोन पिस्तुल, तीन जिवंत काडतुसे, कोयता, मिरचीपूड लोखंडी रॉड अशी घातक शस्त्र मिळाली आहेत याप्रकरणी सराईत गुन्हेगार दुर्गेश बापू शिंदे (वय ३२), प्रमोद संजय सवणे (वय २९), सचिन बबन जाणकार (वय २६), नाना उर्फ सचिन रामचंद्र शिंदे (वय ३२) आणि रामकृष्ण सोमनाथ सानप (वय ३०) सर्व राहणार वाकड, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडी चौकातील पेट्रोलपंपावरील एटीएमवर दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीची गुप्त माहिती पोलीस कर्मचारी प्रमोद कदम यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हरीश माने यांच्या पथकाने काळेवाडी येथील परिसरात सापळा रचला. त्यानंतर बीआरटी मार्गाजवळ स्विफ्ट गाडीत दबा धरून बसलेल्या पाच सराईत आरोपींना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
याप्रकरणी संबंधित आरोपींना अटक केली असून त्यांना १३ तारखेपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. यातील मुख्य आरोपी दुर्गेश याच्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात तब्बल ९ गुन्हे दाखल आहेत. तर सचिन बबनराव जाणकार याच्यावर ५ गुन्हे दाखल आहेत.