पुणे - महाराष्ट्र सरकारने राज्यभरातील मंदिरे तत्काळ उघडावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. याविरोधात आज (शनिवारी )विश्व हिंदू परिषद शंख ढोल नाद आंदोलन करणार आहे.
शंकर गायकर (क्षेत्रीय मंत्री, विश्व हिंदू परिषद) राज्यभरात अनलॉक केले जात असताना, विविध व्यवसाय, संस्था खुल्या केल्या जात आहेत. मार्केट उघडले जात आहेत. खेळाची मैदानं उघडली आहेत. मात्र, मंदिरच का बंद ठेवली जात आहेत याचा या सरकारने विचार करावा आणि तत्काळ मंदिरे खुली करावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे.
महाराष्ट्रातील मंदिरांच्या माध्यमातून हजारो लोकांच्या वर्षभराच्या रोजीरोटीची व्यवस्था होत असते, हे सगळे सरकारच्या निष्काळजीपणाने ठप्प झाले आहे. सरकारने समाजाचा आक्रोश लक्षात घ्यावा. कोट्यवधी हिंदूंच्या भावनांचा विचार करावा आणि दसऱ्याला देवालय भक्तांसाठी खुली करावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे.
तसेच सरकारला जाग यावी यासाठी शनिवारी 24 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात मंदिरांसमोर शंख ढोल यांचा नाद करून आरतीचे आयोजन करत विश्व हिंदू परिषदेने शंख ढोल नाद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.