पुणे -पोलिसांची परवानगी न घेता हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे, भाजप नगरसेविकेच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कार्यक्रमात कोरोना नियमांचे पालन झाले नाही, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न जमवण्याचे आदेश असतानाही या कार्यक्रमाला तब्बल 1800 ते 2000 महिलांची उपस्थिती होती. याप्रकरणी आता नगरसेविका विजयालक्ष्मी मोतीलाल हरिहर यांच्यासह आणखी दोघांवर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २२ फेब्रुवारीला गंजपेठेतील महात्मा फुले वाडा परिसरात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
हळदी-कुंकू कार्यक्रमात कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन, भाजप नगरसेविकेविरोधात गुन्हा दाखल - विजयालक्ष्मी हरिहर यांच्याविरोधात गुन्हा पुणे
पोलिसांची परवानगी न घेता हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे, भाजपच्या नगरसेविकेविरोधात पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजयालक्ष्मी मोतीलाल हरिहर असं या नगरसेविकेचे नाव आहे.

तिघांविरोधात गुन्हा दाखल
नगरसेविका विजयालक्ष्मी मोतीलाल हरिहर, विष्णू आप्पा हरिहर आणि निर्मल मोतीलाल हरिहर (सर्व रा. गुरुवार पेठ ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस कर्मचारी दिनेश खरात यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पुणे शहरात सध्या कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रम घेताना शासकीय नियमावलीचे पालन करणे आवश्यक आहे. मात्र, कार्यक्रमाची परवानगी न घेता विजयालक्ष्मी हरिहर यांनी महात्मा फुले वाडा परिसरात १८०० ते २००० लोकांची गर्दी जमविली. त्याशिवाय सार्वजनिक रस्त्यावर विनापरवाना स्टेज टाकून तिळगूळ वाटप आणि भेटवस्तूचे वितरण केले. कोरोना नियमावलीचे पालन न केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी खडक पोलीस तपास करीत आहेत.