पुणे - भाजप आणि शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदावर दावा करण्यात येत आहे. शिवेसेनेकडून बाण सुटला आहे, आता भाजप शिवसेनेच्या बैठकीत शिवसेना काय भूमिका घेते, यावर सर्व अवलंबून आहे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर लोकसभेच्या निवडणुकांना काँग्रेसने वंचित ही भाजपची 'बी' टीम असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे याबाबत काँग्रेसने स्पष्टीकरण दिल्याशिवाय पुढील बोलणी करण्यात येणार नाही. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये होणाऱ्या पक्षांतराबाबत ते म्हणाले, ब्लॅकमेलिंगचे राजकारण सुरू आहे हे मी मानतो, परंतु राष्ट्रवादीतून भाजपमध्ये जे पक्षांतर सुरू आहे त्यातील अनेक नेत्यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे तिहार ऐवजी भाजपचा जेल या नेत्यांनी स्वीकारला आहे.
राज ठाकरेंचे आंदोलन म्हणजे पळपुटेपणा
राज ठाकरेंच ईव्हीएम विरोधातील आंदोलन म्हणजे पळपुटेपणा आणि फसवेपणा आहे. ईव्हीएम बाबतच्या आक्षेपांबाबत सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगात लढा देणे गरजेचे आहे. तसे न करता केवळ आंदोलन करणार असाल तर तो पळकुटेपणा ठरेल. ईव्हीएम बाबत नागरिकांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. तसेच पक्ष फोडणे हे हिटलरशाहीचे लक्षण आहे. काँग्रेसने या आधी तसेच केले होते. आता भाजपकडून तेच चालू आहे. परंतु मी पक्ष फोडणार नाही. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी मधील कोणाला पक्षात घेणार ही नाही, असेही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितले.
ओबीसी आरक्षणाला धक्का पोहचणार नाही, असे अश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले. मात्र, ते खोटं बोलत आहेत. असा आरोप आंबेडकरांनी यावेळी केला. तसेच विधानसभा निवडणूक होण्याअगोदर पाच जिल्ह्यामधील जिल्हा परिषद निवडणूका भाजपला होऊ द्यायच्या नाहीत. कारण या जिल्हा परिषदेतील 105 जागा कमी होतील, अशी भीती भाजपला आहे. 20 जिल्ह्यात ओबीसी आरक्षण कमी होणार असल्याचा दावा ही त्यांनी केला.