पुणे - पुणे महापालिकेला राज्य शासनाकडून सातत्याने लसपुरावठा होत नसल्याने वारंवार बंद पडणाऱ्या लसीकरण मोहिमेला आता खासगी रुग्णालयात लसीकरण सुरु झाल्याने नव्याने उभारी मिळाली आहे. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्यावतीने कोथरूड येथील बाल शिक्षण संस्था येथे लसीकरणाला सुरूवात झाली आहे. आज 1000 लोकांना 900 रुपयात लसीकरण करण्यात आले आहे. उद्यापासून हे प्रमाण वाढवून दोन हजार करण्यात येणार आहे.
14 ते 44 वयोगटातील नागरिकांचेही लसीकरण सुरू -
खासगी रुग्णालयात लसीकरणाला सुरवात झाल्यानंतर विशेष बाब म्हणजे 14 मे पासून 18 ते 44 वयोगटातील वर्गाचे बंद पडलेले लसीकरण खासगी रुग्णालयात सुरु झाल्याने मोठया प्रमाणात या वयोगटातील नागरिक नोंदणी करून लसीकरण करत आहेत.
शहरातील मोठ्या खासगी रुग्णालयांना शनिवारपासून सिरम इन्स्टिट्यूटकडून थेट लस पुरवठा सुरू झाला असल्याने गेली दोन दिवस काही ठिकाणी प्रत्यक्ष लसीकरण सुरू झाले आहे. यामुळे महापालिकेकडे येणाऱ्या तुटपुंज्या लस साठ्याला आता खासगी रुग्णालयांमधील लसीकरणाचा बूस्टरच मिळाला आहे. त्यातच नागरिकांना प्रथम लस हवी आहे, मग ती पैसे देऊन का मिळावी अशी आता मानसिकता झाली आहे. त्यामुळे अनेकांनी पैसे भरून खासगी रुग्णालयांकडे धाव घेतली आहे. त्यातच कुठल्याही वयोगटाची अट नाही, कोविन अॅपवर नोंदणी करून लागलीच लस मिळत असल्याने युवा वर्ग सध्या मोठ्या प्रमाणात खासगी रुग्णालयांकडे धाव घेत आहे.