पुणे- राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुण्यातील नागरी सहकारी बँकांनी पुढाकार घेतला आहे. नागरी सहकारी बँकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत १ कोटी ५७ लाख ३२ हजार २२२ रुपये मदत म्हणून दिले आहेत. पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन या सहकारी बँकांच्या शिखर संस्थेच्या पुढाकाराने सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्याकडे हा निधी सुपूर्द करण्यात आला.
कोरोनाशी लढा; नागरी सहकारी बँकांची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला १ कोटी ५७ लाखांची मदत - नागरी सहकारी बँक बातमी
नागरी सहकारी बँकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत १ कोटी ५७ लाख ३२ हजार २२२ रुपये मदत म्हणून दिले आहेत. भविष्यातही गरजूंना व शासनाला असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही मदत करणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते यांनी यावेळी दिली.
यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते, उपाध्यक्ष अॅड. साहेबराव टकले, संचालक सुनील रुकारी, निलेश ढमढेरे, जनार्धन रणदिवे, विजयराव ढेरे, दिलीप शिंदे, चंद्रकांत कवडे आदी उपस्थित होते.
अॅड. सुभाष मोहिते म्हणाले, केवळ मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी योगदान देऊन आम्ही थांबलो नाही, तर विविध सहकारी बँकांच्या माध्यमातून अनेक घटकांना मदत केल्याची माहिती त्यांनी दिली. यात ससून रुग्णालयाला पीपीई किट, आंबेगाव, सासवड, इंदापूरसह पुणे मनपातील ४ हजार ५०० कुटुंबांना धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, पोलिसांसाठी ४० ठिकाणी तंबूंची सोय, जनकल्याण समितीतर्फे सुरू असलेल्या कामासाठी ५ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २७ नागरी सहकारी बँकांनी तर प्रत्यक्ष वस्तुरुपी मदत देण्यासाठी ७ बँकांनी सहभाग घेतला आहे. भविष्यात देखील गरजूंना व शासनाला जी मदत लागेल, ती असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.