पुणे - शहरातील कचरा हा शहराजवळ असलेल्या ऊरळी देवाची येथील कचरा डेपोमध्ये टाकला जातो, या कचरा डेपोला उरुळी देवाची येथील ग्रामस्थांचा विरोध असल्याने या विरोधात ते सातत्याने आंदोलन करत असतात. कचरा डेपो असल्याने ऊरळी देवाची येथील ग्रामस्थांसाठी सोयीसवलती पुणे महापालिकेकडून देण्यात आल्या आहेत, तसेच ऊरळी देवाची हे गाव महापालिकेत देखील समाविष्ट करण्यात आले. या सर्व बाबीनंतर येथील ग्रामस्थांना पुणे महापालिकेमुळे आता सोयी-सवलती अधिक मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांचा भ्रमनिरास झाला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
महापालिकेत समावेश केला मात्र सोयीसुविधा नाहीत अन् भरमसाठ करवाढ.. उरुळी देवाची ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
उरुळी देवाची गावाचा महापालिकेत समावेश करण्यात आला. मात्र, गावाला महापालिकेच्या कोणत्याही सोयी सुविधा देण्यात आल्या नाहीत. याविरोधात ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला असून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
महापालिकेत सहभागी झाल्याचे चटके ग्रामस्थांना बसायला लागले आहेत. तसेच झालेल्या कराराबाबत ग्रामस्थांमध्ये असंतोष आहे. या भागात मोठ्या प्रमाणात गोडाऊन आहेत. मात्र, महापालिकेत समाविष्ट झाल्याने इथल्या गोडाऊन धारकांना पूर्वीपेक्षा काही पटीने अधिक कर भरावा लागत असल्याने मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. आमच्या गावात कचरा डेपो टाकला आणि वेगवेगळ्या सवलती देण्याचे आश्वासन दिले. मात्र आम्हाला योग्य प्रमाणात सवलती मिळालेल्या नाहीत, असा आरोप देखील ग्रामस्थांनी केला आहे. तसेच जाचक कराचा मुद्दा महापालिकेने तत्काळ सोडवावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच असे न झाल्यास भविष्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला आहे.
हेही वाचा -भाजपाचा दुटप्पीपणा : महाराष्ट्रात आग्रही तर, सत्ता असलेल्या राज्यात मंदिरे बंद