पुणे -राज्यात पुढील वर्षी होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचनेवरून सरकारमधील तिन्ही पक्षातील नेत्यांमध्ये मतमतांतरे दिसून येत होती. मात्र, आतापर्यंत 2च्या प्रभाग रचनेवर भर देत असलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आता तीन सदस्यीय प्रभाग रचनेच्या मुद्द्याला समर्थन दिले आहे. आगामी महापालिका निवडणुकीत तीनचाच प्रभाग असणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
'हा सर्वांनी एकमताने घेतलेला निर्णय' -
अ, ब, क, ड नगरपरिषदेला 2चा प्रभाग, नगरपंचायतील एकचा प्रभाग, मुंबई महापालिकेच्यासाठीदेखील 1चा प्रभाग आणि त्यानंतर ठाणे, नाशिक, औरंगाबाद, पुणे, पिंपरी, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर यासाठी तीनचा प्रभाग असणार आहे. राज्यात आघाडीचा सरकार असून प्रत्येक जण आपापली भूमिका मांडतच असतो. पण मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटनी जो निर्णय घेतला आहे. तो अंतिम निर्णय झाला आहे. हा निर्णय एकमताने घेतलेला आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.