पुणे - पुढील वर्षी होणाऱ्या राज्यातील महापालिकेच्या निवडणुकीबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्रिमंडळातील नेतेमंडळी तसेच विरोधी पक्षनेते आणि सर्वच गटनेते यांची बैठक पार पडली. याबैठकीत जोपर्यंत ओबीसीवर झालेला अन्याय दूर होत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेऊ नये, असे सर्वच मत असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
'सूक्ष्म आणि लहानमध्ये काय निधी मिळणार' -
सूक्ष्म आणि लहानमध्ये कोणताही निधी मिळणार नाही. निधी द्यायचा झाला तर गडकरी यांचे खाते देऊ शकते, असा खोचक टोला त्यांनी नारायण राणे यांना लगावला. कोरोनाच्या या संकटात सूक्ष्म आणि लघु उद्योग खूप अडचणीत आले आहे. या उद्योगांसाठी देश पातळीवर धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.
महापालिकेच्या वॉर्डबाबत पुढच्या आठवड्यात बैठक -
महापालिकेच्या वॉर्डबाबत आम्ही कुठेही आग्रह केलेला नाही, ही फक्त चर्चा आहे. याबाबत कोणताही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही. प्रभाग एक असेल किंवा दोनच याबाबत कोणत्याही प्रकारचे महाविकास आघाडी सरकारमध्ये निर्णय झालेला नाही. मात्र, मुंबई महानगरपालिकेत एकचा वॉर्ड असणार आहे. पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
'पुढे सणवार आहे, नागरिकांनी खबरदारी घ्यावी' -
पुण्याच्या पॉझिटिव्हीटी रेट हा 2.8 टक्के आहे. पहिल्या आणि दुसर्या लाटेचा अनुभव पाहता टेस्टिंगमध्ये वाढ करण्यात आली आहे. येणाऱ्या काळात सण उत्सव येत आहे. या काळात नागरिकांनी जबाबदारीने वागावे आणि गर्दी न करता शासनाच्या नियमांचे पालन करावे, .असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
हेही वाचा-पोलीस आणि गावगुंडांच्या जोरावर हे सरकार चालतंय - चंद्रकांत पाटील