पुणे- ताटातूट झालेल्या बहीण-भावांची खूप वर्षांनी भेट झाल्याचं काही चित्रपटात आपण पाहिलं आहे. कथा-कादंबरीत असं वाचलंही आहे. मात्र पुण्याच्या बुधवार पेठेत प्रत्यक्षात ही घटना घडली आहे. स्वीडनहून आईच्या शोधात आलेल्या 32 वर्षीय तरुणीला आई तर मिळाली नाही, कारण तिचं निधन झालं होतं. मात्र तिला तिची बहीण मिळाली. एक बहीण बुधवारपेठेत तर दुसरी स्वीडनला राहणाऱ्या या बहिणींच्या भेटीनं दोघींच्याही डोळ्यातून आश्रू तरळले.
महाराष्ट्राच्या एका जिल्ह्यातील महिला कामानिमित्त पुण्यात आली, पण दुर्दैवाने ती वेश्याव्यवसायात ओढली गेली. ससून रुग्णालयात 32 वर्षांपूर्वी तिने एका मुलीला जन्म दिला. परंतु त्या मुलीचा सांभाळ करण्याइतपत परिस्थिती नसल्यामुळं तिला पुण्यातील एका संस्थेला सोपवलं. या संस्थेनं या मुलीला स्वीडनच्या एका दाम्पत्याला दत्तक दिलं. दत्तक देताना काही कागदपत्रं त्या दाम्पत्याला देण्यात आले होते.