पुणे - बाळाला अनाथ आश्रमात ठेवतो, असे सांगून घेऊन गेलेल्या बापाने तेरा दिवसाच्या चिमुकल्याचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जंगलात फेकून दिला. एखाद्या चित्रपटातील कथा शोभावी असा हा प्रकार तब्बल अडीच वर्षानंतर उघडकीस आला आहे. मुंढवा पोलिसांनी या प्रकरणी बाळाच्या बापासह दोघांना अटक केली.
शुभम महेश भांडे (वय 23 वर्षे) आणि त्याचा मित्र योगेश सुरेश काळे (वय 26 वर्षे), अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणी एका 25 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, आरोपी शुभम आणि तक्रारदार तरुणी एकाच कंपनीत काम करत असताना दोघांची ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर 2017 पासून दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. यातून तक्रारदार तरुणीला गर्भधारणा झाली. तरुणीने आरोपी शुभमला ही माहिती दिल्यानंतर लवकरच आपण लग्न करूयात, असे सांगून तिला ससून रुग्णालयात ऍडमिट केले. तिथे पती म्हणून स्वतःचे नाव तिच्या नावासमोर लावले. त्यानंतर तरुणीने 14 मार्च, 2019 रोजी एका बाळाला जन्म दिला.