पुणे - कोणत्याही परिस्थितीत 10 डिसेंबरला शिर्डीत जाणारच असल्याची भूमिका भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी मांडली आहे. शिर्डी संस्थानाने पोषाखासंदर्भात लावलेला फलक काढून टाकावा, अन्यथा दहा डिसेंबरला स्वतःहून बोर्ड काढण्याचा इशारा त्यांनी दिला होता. काल (8 डिसेंबर) रोजी तृप्ती देसाई यांना 8 ते 11 डिसेंबर दरम्यान शिर्डीत मज्जाव करण्यात आला आहे. याबाबत त्यांना विभागीय दंडाधिकाऱ्यांनी नोटीस दिली आहे. मात्र आपल्या भूमिकेवर ठाम राहून देसाई यांनी शिर्डीत जाण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.
बंदी घातली तरी शिर्डीला जाणारच... तृप्ती देसाई निर्णयावर ठाम तृप्ती देसाईंना शिर्डी हद्दीत प्रवेश करण्यास 8 डिसेंबर ते 11 डिसेंबरपर्यंत बंदी करण्यात आली असून शिर्डीचे विभागीय दंडाधिकारी गोविंद शिंदे यांनी संबंधित आदेश काढले आहेत. शिर्डी पोलिसांनी तृप्ती देसाईंना त्यांच्या घरी जाऊन नोटीस दिली. मात्र ही नोटीस एकतर्फी असल्याचं तृप्ती देसाई यांचं म्हणणं आहे. शिर्डी संस्थानाने लावलेला फलक अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधातील आहे. संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्याच्या विरोधात आहे. त्याच्यावर कारवाई करण्याचे सोडून आम्हाला नोटीस दिली जाते, असे त्या म्हणाल्या.
संविधानाने आंदोलन करण्याचा अधिकार आम्हाला दिला आहे. त्यामुळे आम्ही शिर्डीत जाणारच, असा आग्रह देसाई यांनी धरला आहे. शिर्डी संस्थानाने साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी मंदिराच्या आवारात पोषाखासंदर्भात फलक लावले आहेत. भाविकांनी मंदिर परिसरात भारतीय परंपरागत पोषाख घालण्याचे आवाहन संस्थानाच्या वतीने करण्यात आले. याच फलकांना तृप्ती देसाई यांनी आक्षेप घेतला असून भाविकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ही पायमल्ली असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
...अखेर शासकीय नोटीस
भक्तांना पारंपारिक पोषाखात येण्याचे आवाहन शिर्डी देवस्थानाने केले होते. यावर आक्षेप घेत ते फलक हटवण्याची मागणी महिला कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केली होती. आता देसाई यांना 8 ते 11 डिसेंबर दरम्यान शिर्डीत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तृप्ती देसाई यांनी 10 डिसेंबरला शिर्डीत येऊन फलक हटवण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर संबंधित निर्णय घेण्यात आला आहे. शिर्डीचे विभागीय दंडाधिकारी गोविंद शिंदे यांनी देसाई यांच्या प्रवेशबंदी संदर्भात नोटीस दिली आहे. ही नोटीस घेऊन संबंधित अधिकारी तृप्ती देसाई यांच्या घरी दाखल झाले.
काय आहे प्रकरण?
साईबाबांच्या दर्शनासाठी येताना भाविकांनी भारतीय पेहराव करण्याचे आवाहन साई संस्थानाने केले. यासंबंधी मंदिराच्या आवारात फलक लावण्यात आले होते. या आवाहनाला भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असताना भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी यावर आक्षेप घेत शिर्डीत येऊन फलक काढण्याचा इशारा दिला. यावर शिर्डीतील महिला आक्रमक झाल्या असून त्यांनी तृप्ती देसाईंना उत्तर देण्याचा चंग बांधला. स्थानिक शिवसेनेच्या महिला देखील आक्रमक होत त्यांनी देसाई यांना धमकीवजा इशारा दिला.
शिवसेना महिला आघाडी आक्रमक
शिवसेना महिला आघाडीच्या शिर्डीतील कार्यकर्त्यांनी साई संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांचे या निर्णयाबद्दल आभार मानले. पेहराव्याबाबत संस्थानने विनंती केलेली आहे, सक्ती केलेली नाही या मुद्द्याकडे लक्ष वेधत शिवसेना महिला आघाडीने महिलांवर जेव्हा अत्याचार होतात, तेव्हा या तृप्ती देसाई कुठे असतात, असा सवाल उपस्थित केला.तृप्ती देसाईंनी दर्शनासाठी यावे, आम्ही त्यांचे स्वागत करू. मात्र, फलक काढण्याची स्टंटबाजी केली तर सेना स्टाईलने त्यांच्या तोंडाला काळे फासू,असा इशारा शिवसेनेच्या महिला तालुका संघटक स्वाती परदेशी यांनी दिला आहे.