पुणे - कोरोना काळात मागच्या वर्षी झालेल्या लॉकडाऊनमध्ये व्यापाऱ्यांनी जीवावर उदार होऊन नागरिकांना सेवा दिली. जीवाची पर्वा न करता व्यापारी काम करत होते. परंतु, त्या बदल्यात त्याला काय मिळाले? असा प्रश्न पडतो. गेल्या वर्षभरात व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, आता जर लॉकडाऊन झाले तर, व्यापारी उद्ध्वस्त होतील. सरकारने लॉकडाऊन करु नये, व्यापाऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून लॉकडाऊन केलेच तर व्यापाऱ्यांनी एकत्र येत रस्त्यावर उतरून त्याचा निषेध करावा, असे आवाहन पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी केले आहे.
पुणे शहराबरोबरच राज्यात अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने, लॉकडाऊनच्या पर्यायाचा विचार सरकार व प्रशासन पातळीवर सुरु आहे. त्यासंदर्भात आज सचिन निवंगुणे यांनी व्यापाऱ्यांची परिस्थिती सांगितली. ते म्हणाले की, वर्षभराच्या काळात व्यापारी व्यवसाय होत नसल्याने भाडे देखील भरु शकलेला नाही. सर्वांना काही ना काही सवलती मिळत असताना कोरोना व लॉकडाऊनच्या काळात अग्रभागी राहून लढणारा व्यापारी मात्र दुर्लक्षित राहिला आहे. त्याऊलट वीज बिलाची दुप्पट आकारणी होत आहे. आरोग्य विभाग, अन्नधान्य वितरण विभाग, अतिक्रमण विभाग यांच्याकडून कोणत्या ना कोणत्या कारणास्तव व्यापाऱ्यांचीच पिळवणूक होत आहे. व्यापारी एका जागेवर व्यापार करत असून, सर्व नियम पाळत आहे, तरीदेखील त्याचीच कोरोना चाचणी केली जाते. हे सर्व अनाकलनीय आहे, असे सचिन निवंगुणे यांनी म्हटले आहे.