पुणे - ईश्वराची व विश्वाची हेतुगर्भताही त्यांना मान्य नव्हती. 'आधुनिक भारत देशाचे पहिले महात्मा' हे स्थान ज्यांना खरेच शोभून दिसते असे एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे महात्मा जोतिबा फुले (इ. स. १८२७ ते १८९०) हे होत. सन १८ व्या शतकात निर्भीडपणे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक गुलामगिरीतून समस्त मानवाला बाहेर काढण्याचे काम त्यांनी केले. ( Birth Anniversary Of Mahatma Jotiba Phule ) सर्वत्र सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक अंधार दिसत असताना क्रांतीची ज्योत त्यांनी पेटवली. महात्मा ज्योतिबा फुले यांची आज (195)वी जयंती.
त्या दिवशी जोतिबाची यात्रा होती - महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतीराव फुले यांचा जन्म शेतकरी, भाजीपाला व फुलांचा व्यवसाय करणारे गोविंदराव आणि चिमणाबाई यांच्या पोटी (दि. ११ एप्रिल १८२७)रोजी झाला. त्या दिवशी जोतिबाची यात्रा होती म्हणून गोविंदराव आणि चिमणाबाई यांनी तेजस्वी आणि ओजस्वी असलेल्या पुत्राचे नाव जोतिबा असे ठेवले. काही लोकांच्या जीवनात जन्मापासूनच अडचणी आणि संकटे दार ठोठावतच असतात. जोतिबांच्या बाबतीतही असेच काही घडले होते.
पण गोविंदरावांनी तो ऐकला नाही - आई चिमणाबाईंचे अकाली निधन झाले. बाळ जोतिबा आईविना पोरके झाले. आपल्या त्यागी पत्नीच्या निधनाने गोविंदरावाना अतिशय दुःख झाले. काय करू आणि काय नको अशी त्यांची मनःस्थिती झाली. काहींनी त्यांना दुसरे लग्न करण्याचा सल्ला दिला पण गोविंदरावांनी तो ऐकला नाही. ज्या काळात एक पत्नी जिवंत असतानाही दोन-तीन चार विवाह करण्याची पद्धत होती अशा काळातही गोविंदरावांनी दुसरे लग्न केले नाही यावरून त्यांचे चिमणाबाईवर असलेल्या प्रेमाची जाणीव होते.
जोतिरावांच्या हाती कुदळ खुरपे आले -भारतात शूद्रांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. इंग्रज राजवटीमुळे तो अधिकार मिळायला सुरुवात झाली. पुण्यात पहिली मराठी शाळा (सन १८२४)मध्ये ख्रिश्चन मिशनऱ्यांनी काढली होती. या शाळेत गोविंदरावांनी जोतिबांना वयाच्या ७ व्या वर्षी दाखल केले. जोतिबा हे पहिल्यापासूनच कुशाग्र बुद्धीमत्तेचे, कष्टाळू, प्रतिभासंपन्न असल्याने शाळेतील सर्व घटक त्यांनी आत्मसात करायला सुरूवात केली. तोंडी गणिते सोडवणे त्यांना सहज शक्य होऊ लागले त्यांची अभ्यासातील उल्लेखनीय प्रगती पाहून मात्र काहींचा जळफळाट झाला आणि त्यांनी गोविंदराव यांना भडकवले आणि त्यामुळे जोतिरावांच्या हातचे पाटी दफ्तर व दौत लेखणी जाऊन त्या ऐवजी हाती कुदळ खुरपे आले.
सावित्रीबाई फुले यांच्याशी झालं लग्न - जोतिबा तेरा वर्षांचे असताना त्यांचा विवाह सगुनाबाईंच्या पसंतीनुसार सातारा जिल्ह्यातील नायगावच्या खंडोजी नेवसे पाटलांची चतुरस्त्र नऊ वर्षाची कन्या 'सावित्री' शी (सन १८४०)मध्ये मोठ्या थाटामाटात झाला. पुढे शेतीच्या कामाच्या दिवसात जोतीराव आणि गोविंदराव पहाटे उठून मळ्यात जात फुलझाडांची काळजी घेत. सावित्रीबाई घरातील सर्व कामे आवरून जेवण घेवून मळ्यात जात असे. शेतात सकाळच्या वेळी कामे उरकून जेवण झाले की सर्व मंडळी आंब्याच्या झाडाखाली (जोतीराव, सावित्रीबाई आणि सगुनाबाई) स्वतःची शाळा सुरू करत. जमिनीची पाटी व काकडीची पेन्सिल करून अक्षर गिरवत बसत. (१८४८ साली)मुलींसाठी पहिली शाळा सुरू दोन तीन वर्षांच्या अंतरानंतर गफार बेग मुन्शी आणि ख्रिश्चन मिशनरी लिजीटसाहेब यांच्या मदतीने जोतिबांचे शिक्षण पुन्हा सुरू झाले.
स्त्रीवर्ग डोळ्यासमोर ठेवून महत्त्वाचे कार्य -फुल्यांनी (१८४८ ते १८५२)या कालखंडामध्ये सबंध स्त्रीवर्ग डोळ्यासमोर ठेवून महत्त्वाचे कार्य केले. ज्या वेळेस युरोपियन देशांमध्ये स्त्रीला मतदानाचा हक्क द्यायचा की नाही, यावर चर्चा व गदारोळ सुरू होता, त्या वेळेस भारतामध्ये स्त्रीला माणूस म्हणून जगण्याचा हक्कदेखील नाकारलेला होता. फुल्यांच्या मते, स्त्री ही कोणत्याही जाती वा वर्गातली असो, तिला भेदभावाला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे त्यांनी स्त्रियांना आत्मसन्मानाने जगण्यासाठी शिक्षणाची दारे खुली केली. त्यांनी काढलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेमध्ये नऊ मुली शिक्षण घेत होत्या, त्यापैकी सहा ब्राह्मण समुदायातल्या होत्या हेही अत्यंत महत्वाचे आहे.
सत्यशोधक समाजाची स्थापना - जोतीराव हे बोलणारे समाज सुधारक नव्हते, तर प्रत्यक्ष कृती करणारे समाज सुधारक होते. कोणत्याही कर्मकांडाला थारा नसलेला आणि ईश्वराची भक्ती करण्यासाठी मध्यस्थाना नाकारून प्रत्येक मानवाला अधिकार देणारा,स्त्री-पुरूष यात भेद न करणारा संपूर्ण समतावादी अश्या 'सत्यशोधक समाजाची स्थापना (२३ सप्टेंबर १८७३)करून धार्मिक गुलामगिरी मोडीत काढण्याचे काम केले.
समस्त मानव जातीला मुक्त करण्याचं महान कार्य केले -महात्मा जोतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचा शोध घेवून जीर्णोध्दार केला. छत्रपतींच्या कार्यावर सोप्या भाषेत आठ पोवाडे लिहून छत्रपतींचा प्रेरणादायी इतिहास लोकांपर्यंत पोहचवला. त्यांनी गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसुड, ब्राम्हणांचे कसब या ग्रंथातून सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील गुलामगिरीवर प्रहार करून समस्त मानव जातीला मुक्त करण्याचे महान कार्य केले आहे.
हेही वाचा -महाराष्ट्र गुणांचा पूजक आहे, माथेफिरू गुणरत्नांचा नाही! सामनातून भाजपवर घणाघात