पुणे -सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांना यावर्षी लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरविले जाणार आहे. पूनावाला समूहाच्या सीरम इन्स्टिट्यूटने आपल्या कोव्हिशील्ड लशीने भारतासह जगभरातील कोट्यवधी नागरिकांना कोरोनापासून सुरक्षित ठेवले. विविध प्रकारच्या लसनिर्मितीमधील अग्रगण्य कंपनी असलेल्या ‘सीरम’ने जागतिक स्तरावर मानवी आरोग्याच्या रक्षणार्थ महत्त्वाची भूमिका बजावली आहे. लोकमान्यांच्या चतुःसूत्रीतील स्वदेशीच्या तत्त्वासाठी डॉ. पूनावाला यांच्या नेतृत्वाखाली पूनावाला समूहाच्या या कंपनीने मोठी झेप घेतली. ते अधोरेखित करण्यासाठी टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्वस्तांनी डॉ. सायरस पूनावाला यांची यंदाच्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी एकमताने निवड केली आहे.
स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, एक लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप
13 ऑगस्ट रोजी होणार्या पुरस्कार वितरण सोहळ्यास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. माजी केंद्रीय मंत्री आणि टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त सुशीलकुमार शिंदे, महापौर मुरलीधर मोहोळ यांची सन्माननीय उपस्थिती राहणार आहे. त्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता टिळक महाराष्ट्र विद्यापीठात हा सोहळा होणार आहे. दरवर्षी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी दिनी दि. 1 ऑगस्ट रोजी पुण्यात टिळक स्मारक मंदिरात होणार्या विशेष समारंभात पुरस्काराचे वितरण होते. यंदाचा समारंभ 13 ऑगस्ट रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निमंत्रितांच्या उपस्थितीत होणार आहे. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि एक लाख रुपये असे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.