पुणे - ठाकरे सरकारमधील अनिल परब, अनिल देशमुख नंतर तीसरा कॅबिनेट मंत्री असलेल्या अनिलचे घोटाळे पुराव्यासाहित मी पुढच्या आठडवड्यात जाहीर करेन. तसेच भावना गवळीचे समर्थन करणाऱ्या शरद पवार यांच्या बारामतीपासून विसर्जनाला सुरुवात होईल, असा गर्भित इशारा भाजपा नेते किरीट सोमैया यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिला आहे. पुणे दौऱ्याची सुरुवात मुळशी भागातील अनिल परब यांच्या कथित बेनामी प्रॉपर्टीपासून करून जरांडेश्वर कारखाना खरेदी विक्री घोटाळा प्रकरणी चर्चेत असलेल्या पुणे जिल्हा सहकारी बँकेला भेट देण्यापूर्वी सोमैया यांनी पत्रकार परिषदेत अनेक सनसनाटी आरोप केले.
'मग अनिल परब मंत्रिमंडळात कसे' -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझे यांच्या माध्यमातून माजी मृहमंत्री अनिल देशमुख यांनी संजीव पलांडे, तर परिवहनमंत्री अनिल परब यांनी बजरंग खरमाटे या अधिकाऱ्याच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची बेनामी संपत्ती गोळा केली. आज सकाळी मी बजरंग खरमाटे याच्या फॉर्महाऊसची पाहणी केली. आत्तापर्यंत 40 प्रॉपर्टीची लिस्ट ईडी आणि इन्कम टॅक्सला देण्यात आली आहे. त्याची मार्केट व्हॅल्यू 750 कोटी होत आहे. दोन ते तीन आठवड्यानंतर पहिली अॅक्शन होणार आहे. बजरंग खरमाटे आणि अनिल परब यांच्यातील संबंधाबाबत आमच्याकडे काही पुरावे हाती लागले आहे. अनिल परब यांचे बेकायदेशीर रिसॉर्ट पाडायचे प्रतिज्ञापत्र ठाकरेंनी लोकयुक्तांनकडे दिले आहे. मग अद्याप ते मंत्रिमंडळात कसे, असा सवालदेखील यावेळी सोमैया यांनी केला आहे.
तरी शरद पवार भावना गवळींचे समर्थन करतात -
भावना गवळी यांनी 118 कोटींचा घोटाळा केला, तरी शरद पवार त्यांचे समर्थन का करतात, असा प्रश्न सोमैया यांनी उपस्थित केला. भावना गवळी या दोन वर्षांनंतर तक्रार करतात की त्यांच्याच कार्यालयातून पाहाटे 5 वाजता 7 कोटीची चोरी झाली. हे 7 कोटी आले कुठून हे शरद पवार यांनी भावना गवळी यांना विचारावे. भावना गवळी यांनी रिसॉर्ट अर्बन क्रेडीट सोसायटीतून 40 वेळा पैसे काढले. ही रक्कम 18 कोटी 96 लाख एवढी आहे, असा आरोपही सोमैया यांनी केला.