पुणे - प्रदेशाध्यक्ष बदलण्याची कुठेही चर्चा नाही. आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे अतिशय चांगले काम करत आहेत. पक्ष त्यांच्या पाठीशी आहे. हायकमांड देखील त्यांच्या पाठीशी आहे. आणि आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत. त्यामुळे कृपया चुकीच्या कांड्या पिटवू नका, पतंगबाजी करू नका. तसेच, चुकीच्या बातम्या करु नका, बातम्या कमी पडल्या तर मला सांगा, असा चिमटा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी पत्रकारांना काढला. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतील आयोजीत कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
'अनेक समाजापर्यंत आरक्षण पोहचलेला नाही'
नुकता केद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. त्यातील काही मंत्र्यांना भेटण्यासाठी, राज्यातील काही प्रश्नांसाठी या भेटीगाठी सुरू आहेत. यामध्ये कुठलेच संघटनात्मक बदल होणार नाहीत अस फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे पद्मश्री पुरस्कार मिळालेल्या सय्यद भाई, नामदेव कांबळे, गिरीश प्रभुणे, पोपटराव पवार यांचा सत्कार देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी, वंचितातील वंचित घटक आहे त्या घटकांना मुख्य धारेत कसे, आणता येईल, यासाठी काम केले पाहिजे. आज मातंग समाज असेल, बुरुड समाज असेल असा समाजापर्यंत आरक्षण पोहचलेला नाही. त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी वर्गवारी केली पाहिजे. अशी अपेक्षाही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली आहे.