पुणे - नक्षली चळवळ ही व्यवस्थेच्या विरोधात असलेली चळवळ आहे. मराठा आरक्षणावरून नक्षलवाद्यांनी लिहिलेल्या पत्राकडे फार लक्ष देण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. व्यवस्थेच्या विरोधात काम करत असलेल्यांनी इतर लोकांना तुम्ही आमच्यात या आणि संघर्ष करा असे सांगणे हे देशाला एकप्रकारे आव्हानच किंवा धोकाच आहे, असे गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले. ते पुण्यात बोलत होते.
नक्षलवाद्यांच्या पत्राला महत्व देऊ नका -
मंगळवारी पुण्यातल्या मांजरी येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या बैठकीसाठी वळसे पाटील आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नक्षलवाद्यांच्या या कृतीचा जास्त विचार करायची गरज नाही, बाकी आपल्या लोकशाही व्यवस्थेमध्ये राज्यघटना, सरकार, न्यायालये यांच्या माध्यमातून सगळे प्रश्न सोडवले जात आहेत. लोकशाही मार्गाने होणारे आंदोलनं, मोर्चे तसेच चर्चेतून प्रश्न सुटत असतात, त्यामुळे नक्षलवाद्यांच्या या पत्राला महत्व देऊ इच्छित नाही, असे गृहमंत्री वळसे पाटील यावेळी म्हणाले.