पुणे : 15 ऑगस्ट 26 जानेवारी ( Republic Day 2022 ) हे दिवस जवळ आले की, आपल्याला रस्त्यारस्त्यांवर काड्या तावलेले छोटे राष्ट्रध्वज दिसू लागतात. हे झेंडे येतात कुठून, ते तयार कुठे होतात, असा प्रश्न पडलाय कधी तुम्हाला? हे झेंडे पुण्यातील राजेंद्र नगरमधील शेख कुटुंबाकडून शहरभर पुरवले जातात. त्यांच्या तीन पिढ्या अभिमानाने हे काम करत ( Flag Making By Shaikh Family In Pune ) आहेत.
यंदा 20 हजारहुन अधिक झेंडे बनविले
15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या आधी 4 महिन्यांपूर्वी आम्ही झेंडे करण्याचं काम सुरू करतो. दिवसाला पाच हजार झेंडे सहज बनवतो. 'सारे पुना शहरमे जिधर देखो हमारे यहाँसे ही झंडा जाते है', असं सांगत यंदा 20 हजारहुन अधिक झेंडे केल्याचं शेख कुटुंबीय अभिमानाने सांगत आहे. दरवर्षी 50 हजारहुन अधिक झेंडे बनवतात. पण मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या पश्वभूमीवर शाळा- महाविद्यालय बंद असल्याने 2 वर्ष थोड्याश्या प्रमाणात झेंडे बनवले. पण यंदा शाळा जरी बंद असल्या तरी 20 हजारहून अधिक झेंडे बनविले असून, यंदा चांगला व्यवसाय झाल्याचं शेख कुटुंबीय अभिमानाने सांगत आहे. कुटुंबातल्या महिलांच्या हातांचा स्पर्श झाला नाही, असा छोटा झेंडा पुण्यात कदाचित सापडणार नाही असं देखील यावेळी शेख म्हणाल्या.
व्यवसाय म्हणून नव्हे तर देशसेवा म्हणून
शेख कुटुंबाचा हा पारंपरिक व्यवसाय. राजेंद्र नगरमधील दत्त मंदिराजवळ शेख कुटुंब राहतं. या कुटुंबातील पुरुष लग्न किंवा पार्ट्यांमध्ये डेकोरेशनचं काम करतात. पण ऑगस्ट व जानेवारीत मात्र ही मंडळी झेंडे तयार करण्याच्या कामात गढून जातात. शहरातील सर्व किरकोळ विक्रेते यांच्याकडूनच झेंडे नेतात. स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनी शहरभर चक्क लाखभर झेंडे शेख कुटुंबियांकडून पुरवले जातात. "हमारे ससूरजी से इस काम का सिलसिला शुरू हुआ, उसके बाद हमारे घर में अबतक ये काम चालू हैं. सब औरते और बच्चे मिलके झंडे बनाते है," असं शेख सांगतात. हे काम करायला आम्हाला अभिमान वाटतो. हे काम आम्ही व्यवसाय म्हणून नव्हे तर देशसेवा म्हणून करत असतो, असं देखील यावेळी शेख म्हणाल्या.