पुणे -कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील आठ महिन्यांपासून बंद असणारे चित्रपटगृह कायमस्वरूपी बंद करून, त्या जागी इतर व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी एकपडदा चित्रपटगृहांच्या मालकांनी केली आहे. त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना दिले आहे.
कोरोनाचे संकट नियंत्रणात आल्यानंतर राज्य सरकारने काही अटी-शर्ती घालून, राज्यभरातील चित्रपटगृहे 5 नोव्हेंबरपासून सुरू करण्याची परवानगी दिली आहे. परंतु 50% क्षमतेने चित्रपटगृह चालवणे शक्य नसल्यामुळे पुण्यातील एकपडदा चित्रपटगृह अद्याप उघडण्यात आलेली नाहीत. गेल्या 8 महिन्यांपासून चित्रपटगृहे बंद असल्यामुळे व्यावसायिक अडचणीत आहेत. आताही सरकारने चित्रपटगृहे सुरू करण्याची परवानगी दिली, मात्र 50 टक्के दर्शकांच्या उपस्थितीची अट घातल्याने हा व्यवसाय तोट्यात सुरू आहे. त्यामुळे एकपडदा चित्रपटगृहे बंद करून, त्याजागी दुसरा व्यावसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी या चित्रपटगृहांच्या मालकांनी केली आहे.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये 34 एकपडदा चित्रपटगृहे
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात 1991 साली एकूण 34 एकपडदा चित्रपटगृहे होती. त्यातील 18 चित्रपटगृहे बंद आहेत. मात्र ती कायमस्वरूपी बंद करण्याची परवानगी सरकारकडून देण्यात आलेली नाही. सध्या अडीच लाख लोकवस्ती असलेल्या कोणत्याही शहरांमध्ये चित्रपटगृह बंद करण्याची परवानगी आहे. परंतु महानगरपालिका क्षेत्राच्या हद्दीत अशा प्रकारची परवानगी नाही. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात असे अनेक बंद चित्रपटगृहे आहेत. हा व्यावसाय परवडत नसल्याने ही चित्रपटगृहे कायस्वरूपी बंद करून, त्या जागी दुसरा व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी चित्रपटगृहांच्या मालकांनी केली आहे.