महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली, लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज - पुणे कोरोना लेटेस्ट न्यूज

पुण्यात दररोज नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. शहरात दोन आठवड्यांपूर्वी दररोज आठशे ते नऊशे रुग्ण आढळून येत होते. मात्र गेल्या सोमवारपासून पुण्यामध्ये हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे पुण्यात 18 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्वांचे लसीकरण करण्यात यावे असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ
पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

By

Published : Mar 15, 2021, 7:06 PM IST

पुणे -शहरात दररोज नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. शहरात दोन आठवड्यांपूर्वी दररोज आठशे ते नऊशे रुग्ण आढळून येत होते. मात्र गेल्या सोमवारपासून पुण्यामध्ये हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. तर गेल्या तीन दिवसांत दीड हजारांपेक्षा अधिक जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, मात्र दुसरीकडे त्याप्रमाणात लसीकरण होत नसल्याचे चित्र आहे.

गेल्या आठवड्यात लसीकरण केंद्रांवर सर्व्हर डाऊन झाल्यामुळे लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना ताटकळत बसावे लागले, सोमवारी देखील काही लसीकरण केंद्रांवर सर्व्हर डाऊन होते. तर रविवारी ज्या नागरिकांचे लसीकरण झाले नाही, अशा नागरिकांनी सोमवारी लसीकरण केंद्रावर धाव घेतली. त्यामुळे अनेक लसीकरण केंद्रांवर गर्दी झाली होती. दरम्यान आतापर्यंत पुण्यात कोव्हिशिल्ड लस देण्यात येत होती. मात्र आता कोव्हिशिल्ड लस महापालिकेकडे उपलब्ध नसल्याने कोव्हॅक्सिन ही लस दिली जाते आहे. अस असलं तरी दोन्ही लस चांगल्याच असून, कोरोनावर परिणामकारक असल्याचे डॉक्टर सांगतात.

पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली

18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याची गरज

नागरिकांनी लस कुठली हे न पाहता लस घेतली पाहिजे, असे सांगितले जाते आहे, दरम्यान पुणे शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता सरकारने पुणे शहरातल्या 18 वर्षांवरील सर्वांचे तातडीने लसीकरण केले पाहिजे, देशात इतर ठिकाणी ज्याप्रमाणे कोरोनाची लस ही चार टप्प्यांत दिली जात आहे, तो नियम पुण्यात न लागू करता, पुण्यातील 18 वर्षांवरील सर्व नागरिकांचे तातडीने लसीकरण करावे, असं मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

नागरिकांना कोव्हॅक्सिन लस देणार

पुणे महानगरपालिकेकडे असलेल्या कोव्हीशिल्ड लसीचा साठा संपल्याने आता कोव्हॅक्सिन लस देण्यात येत आहे. मात्र नवीन लोकांना कोव्हॅक्सिन देण्यात येत असली तरी, ज्यांचा दुसरा डोस आहे त्यांच्या बाबतीत गोंधळ दिसून येतो आहे. दरम्यान महानगरपालिकेकडे कोव्हिशिल्ड लसीचा काही साठा उपलब्ध आहे. जो दुसऱ्या डोस घेणाऱ्यांना देण्यात येईल आणि नवीन नागरिकांना कोव्हॅक्सिन देण्यात येईल असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details