पुणे - पुणे शहरातील फोफावत असलेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी गेल्या एक वर्षाच्या महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यांचा (मोक्का) दंडुका उगारला आणि तब्बल 50 टोळ्यांविरोधात मोक्काची कारवाई करण्यात आली. शहरात 50 पेक्षा अधिक टोळ्यांविरोधात मोक्काची कारवाई करण्यात आली असली, तरी शहरातील गुन्हेगारी किंवा गँगवॉर कमी न होता ते दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दिवसाढवळ्या एका टोळीकडून दुसऱ्या टोळीवर गँगवॉर होणे, दिवसाढवळ्या दहशत माजवण्यासाठी दुकानांची तोडफोड, अशा अनेक घटनांमध्ये शहरात वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
यामुळे वाढत आहे गुन्हेगारी
पुणे शहरात पुणे पोलिसांकडून येथील वेगवेगळ्या टोळ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, गुन्हेगारी थांबण्याचे नाव घेत नाहीये. दरम्यान, याचे मुख्य कारण म्हणजे वाढती बेरोजगारी. तरुणांमध्ये गुन्हेगारी बाबत वाढत असलेलं आकर्षण तसेच विविध वेबसिरीजमध्ये दाखवत असलेली गुन्हेगारी आहे. त्याच पध्दतीने कोरोना काळात ज्या पद्धतीने लॉकडाउन लावण्यात आले. या लॉकडाउनमुळे मोठ्या प्रमाणात लोकांचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे रोजगार गेलेल्या या तरुणांना अजूनही रोजगार मिळालेला नाही. दरम्यान, लवकरात लवकर कुठे पैसा मिळेल तर तो मार्ग आहे गिन्हेगारी आणि याच कारणाने काही लोक गुन्हेगारीकडे वळले आहेत. अशी माहिती माजी पोलीस अधिकारी राजेंद्र भामरे यांनी बोलताना दिली आहे.
अग्निशास्त्र सहज उपलब्ध होत आहे
गुन्ह्यात वापरण्यात आलेली शास्त्र हे देशी बनावटीची असतात. आपल्या राज्यात अग्निशास्त्र ही मध्यप्रदेश आणि बिहार या राज्यातुन येत असतात. पोलिसांच्या वतीने अग्निशास्त्राबाबत कारवाई केली जात आहे. ही कारवाई हे साहित्य विकण्यासाठी जे आले आहेत त्यांच्यावर केली जाते. मात्र, या संदर्भातील काम करणाऱ्या ज्या टोळ्या आहेत त्यांच्यावर मात्र कारवाई होत नाही. इतिहासात एक दोन वेळातच ज्या कारखान्यांमध्ये हे अग्निशास्त्र बनविले जातात त्यांच्यावर कारवाई केली गेली आहे. त्यांच्यावर जर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली तर अग्निशास्त्रचा जो साठा आपल्याकडे येत आहे तो येणे कमी होईल, असेही देखील भामरे यावेळी म्हणाले आहेत.
एका वर्षात 50 हुन अधिक टोळ्यांवर मोक्का
गेल्यावर्षी सप्टेंबर ते डिसेंबरदरम्यान पुण्यातल्या 7 टोळ्यांवर मोक्का कारवाई करण्यात आली, तर टोळ्यांतल्या 54 गुन्हेगारांना अटक करण्यात आली. यावर्षी जानेवारीपासून तब्बल 43 टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आणि यात 303 आरोपी अटक आहेत. निलेश घ्याववळ टोळी, राजाभाऊ राठोड टोळी, सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर टोळी, दुधाने टोळी, इराणी टोळी अश्या विविध टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.