बुधवार पेठेतील दूतांचा सन्मान; तणावमुक्त राहण्यासाठी लाफ्टर योगाचेही आयोजन
कोरोनासारख्या महामारीमुळे समाजातील सर्वच घटकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. अशा रोगराईच्या काळातही परिसर स्वच्छ ठेवणारे स्वच्छता दूत न थांबता काम करीत आहेत. आपल्या व घरातील व्यक्तींच्या आरोग्याची चिंता मनात असतानाही आपले काम ते चोख पार पाडत आहेत. या कोरोना वॉरियर्सच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
पुणे - आजची परिस्थिती पाहता येणाऱ्या काळात मानसिक आजार वाढणार आहेत. मानसिक आजारांपासून दूर राहायचे असेल तर शरिराबरोबर मनाचा व्यायाम देखील गरजेचा आहे. हास्याने मनावरील ताण कमी होतो. प्रत्येकजण समस्येविषयी बोलतो, मात्र समस्या आली की ती सोडविण्याविषयी कोणी बोलत नाही. जेव्हा समस्या येते तेव्हाच त्यातून रोजगाराची संधीदेखील उपलब्ध होते. ही संधी शोधा म्हणजे तुम्ही आजच्या परिस्थितीचा सामना करू शकाल. ज्याच्याकडे मनाची ताकद असते तो कोणत्याही आजारातून बरा होऊ शकतो. हास्यातून जगण्याची प्रेरणा मिळते त्यामुळे नैराश्य कमी करण्यासाठी हसत राहा, असे मत लाफ्टरयोगा ट्रेनर मकरंद टिल्लू यांनी व्यक्त केले.
बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्टच्यावतीने कसबा पेठ विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना कोरोना वॉरियर्सचा सन्मानपत्र देवून सन्मान करण्यात आला. यावेळी स्वच्छता अधिकारी अशोक भालेराव, साईनाथ मंडळचे अध्यक्ष पियूष शहा, नरेंद्र व्यास, संतोष शर्मा, संकेत देशपांडे, शरण रटकळकर, कुमार आणवेकर, नावेदभाई शेख, साहिल केळकर, सर्वेश पवार, भोला वांजळे हे उपस्थित होते. यावेळी डॉ. विजय पोटफोडे, डॉ. पराग रासने जिव्हाळा परिवारचे निरंजन जाधव, वंदे मातरम संघटनेचे किरण राऊत, आशा परिवारचे पुरूषोत्तम डांगी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी सामाजिक अंतर ठेवून मास्क, पौष्टीक चिक्की, आयुर्वेदिक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.